Conakry Guinea Landslide 2026: गिनीची (Guinea) राजधानी कोनाक्री (Conakry) येथील दार एस सलाम या भागात एका भीषण दुर्घटनेत 22 जणांचा करुण अंत झाला आहे. रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या महाकाय डोंगरावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले. यामुळे कचऱ्याचा ढिगारा ओसंडून वाहू लागला आणि भूस्खलन होऊन त्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक झोपड्या चिखल व कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.
मृतांची संख्या आणि बचाव कार्य
या दुर्घटनेत आतापर्यंत 22 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पहाटे 3 च्या सुमारास अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर खचला आणि नागरिकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. आपात्कालीन पथके आणि नागरी संरक्षण दलाकडून घटनास्थळी वेगाने मदत व बचावकार्य राबवले जात आहे. प्रशासनाने यापूर्वीच या भागातील धोकादायक झोपड्या खाली करण्याबाबत स्थानिक रहिवाशांना नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसांनंतर अनेकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते, मात्र धोका माहित असूनही काही लोक अद्याप तिथेच राहत असल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. गिनीच्या नागरी संरक्षण सेवेने (Civil Protection Service) या घटनेची माहिती दिली आहे.
प्रशासकीय नोटिसांकडे दुर्लक्ष; धोका माहीत असूनही नागरिक तिथेच राहिले
नागरी संरक्षण सेवेनुसार, कचऱ्याच्या डोंगराजवळ राहणाऱ्या रहिवाशांना परिसर रिकामा करण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते. प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर अनेक कुटुंबांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते. मात्र, काहींनी धोक्याची शक्यता असूनही झोपड्या रिकाम्या केल्या नाहीत. भीषण दुर्घटना घडली तेव्हा घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक झोपेत उपस्थित होते, ज्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढले.
चिखल आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली शोधमोहीम वेगाने सुरू
पावसाचे पाणी साचल्यामुळे कचऱ्याचा मोठा भाग थेट वस्तीवर येऊन कोसळल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याचे आणि अशा धोकादायक ठिकाणी पुन्हा न राहण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक भाग असूनही तिथे राहणे किती जीवघेणे ठरू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेनंतर संपूर्ण कोनाक्री शहरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.