देशभरात चर्चेत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर CBIकडून विविध राज्यांमध्ये तपास सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपासून लातूर आणि पुण्यात चौकशीचे सत्र सुरू होते. या तपासादरम्यान RCC क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची अनेक तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत काही महत्त्वाच्या बाबी संशयास्पद आढळल्याने अखेर त्यांना CBIने ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.
लातूर शहर हे ‘लातूर पॅटर्न’मुळे देशभर प्रसिद्ध आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे या प्रकरणाचा संबंध लातूरशी जोडला गेल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, CBIच्या तब्बल 28 अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी केली. मोटेगावकर यांची तब्बल आठ ते दहा तास विचारपूस करण्यात आली होती.
या प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले. त्यानंतरच तपास यंत्रणांचे लक्ष शिवराज मोटेगावकर यांच्याकडे वळल्याची माहिती समोर येत आहे. कुलकर्णी यांच्या जबाबातून काही व्यवहार आणि संपर्कांची माहिती मिळाल्यानंतर CBIने पुढील कारवाईला वेग दिला.
कोण आहेत संचालक शिवराज मोटेगावकर?
शिवराज मोटेगावकर हे महाराष्ट्रातील कोचिंग क्षेत्रातील परिचित नाव मानले जाते. ‘M सर’ म्हणून ओळखले जाणारे मोटेगावकर यांनी लातूरमध्ये RCC Classes ची स्थापना केली होती. रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. सुरुवातीला अत्यंत मर्यादित साधनांमधून त्यांनी शिकवणी सुरू केली होती. शेतकरी कुटुंबातून आलेल्या मोटेगावकर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोचिंग क्षेत्रात मोठं नाव कमावलं. सुमारे 1999 च्या काळात त्यांनी छोट्या वर्गातून कोचिंग सुरू केलं होतं. कालांतराने RCC Classes हे NEET आणि JEE परीक्षेच्या तयारीसाठी राज्यातील प्रसिद्ध संस्थांपैकी एक बनले. हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतलं आहे. मात्र आता NEET पेपरफुटी प्रकरणात त्यांचं नाव समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.