दावोसमधून राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणणार असल्याने रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंतही आहेत. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर करार होणार असून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘तुमच्या नाकासमोर राज्यातील प्रकल्प पळवले गेले. हे प्रकल्प गुजरातने पळवले. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झाले आहे. गुंतवणूक गेली आणि रोजगारही गेले आहेत. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा’
‘दावोसमधून काय येतं ते माहीत नाही. तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते आणा. वेदांत, एअरबससारखे प्रकल्प गेले. दोन लाख कोटीच्यावरची गुंतवणूक तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन या. दावोसचे करार कसे होतात हे आम्हाला माहीत आहे. तिकडे जगभरातून राज्यकर्ते येतात. आपले करारमदार करतात. मग तुम्ही सांगता पाच लाख कोटीचे करार झाले, दहा लाख कोटींचे करार झाले. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी दावोसला जाऊन किती कोटीचे करार केले ते सिद्ध करू शकले नाही.’ असं ते यावेळी म्हणाले.
न्याय व्यवस्थेतबाबत बोलताना राऊत म्हणाले, ‘कपिल सिब्बल यांनी सांगितलं सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छिते. इतर सर्व यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. आता न्याय व्यवस्थेवर हातोडा घालायचा बाकी आहे. ती प्रक्रिया सुरू झालीय असं मला वाटतंय.’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.