Charter Flight Crash: अमेरिकेतील अलास्का प्रांतामध्ये गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. आठ प्रवाशांना घेऊन जाणारे एक चार्टर विमान पश्चिम अलास्कामधील एका दुर्गम लष्करी रडार केंद्राजवळ कोसळले. या अपघातात विमानातील सर्व आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकन लष्कराने अधिकृतपणे दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकन लष्करी दल आणि स्थानिक नागरिकांवर शोकाकुल कळा पसरली आहे.
'केप न्यूएनहॅम' विमानतळाजवळ घडली दुर्घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा विमान अपघात अलास्कातील प्रमुख शहर अँकरेजपासून पश्चिमेला सुमारे 450 मैल तरावर असलेल्या 'केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साइट' येथील विमानतळावर झाला. हे ठिकाण भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम मानले जाते. विमान लँड होत असताना किंवा उड्डाण घेत असताना हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, अपघातामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
लष्कराकडून तीव्र दुःख आणि संवेदना व्यक्त
या दुर्घटनेनंतर अमेरिकन हवाई दलाचे लेफ्टनंट जनरल रॉबर्ट डेव्हिस यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'अलास्कन कमांड', 'अलास्कन नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड रिजन' आणि 'इलेव्हन्थ एअर फोर्स'चे कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणारे डेव्हिस म्हणाले, "आमच्या लष्करी कुटुंबासाठी आणि आम्ही ज्या समुदायाची निष्ठापूर्वक सेवा करतो, त्या सर्वांसाठीच ही एक न भरून निघणारी खूप मोठी हानी आहे. या अपघातामुळे आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे."
सिनेटर लिसा मुर्कोव्स्की यांच्याकडून श्रद्धांजली आणि यंत्रणांचे आभार
अलास्कातील वरिष्ठ सिनेटर लिसा मुर्कोव्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, केप न्यूएनहॅम येथे झालेल्या विमान अपघाताची माहिती मिळताच अत्यंत दुःख झाले असून, अलास्कातील जनतेच्या भावना या दुःखात सहभागी आहेत. मी स्वतः 'सिक्युरिटी एव्हिएशन'सोबत अलास्कामध्ये बराच प्रवास केला आहे आणि त्यांच्या अनेक अनुभवी वैमानिकांना जवळून ओळखते.
या कठीण प्रसंगी वेगाने मदतीसाठी धावून आलेल्या यंत्रणांचे आभार मानताना त्या म्हणाल्या, घटनास्थळी तातडीने धाव घेऊन शोध आणि बचाव कार्य सुरू केल्याबद्दल मी 'अमेरिकन कोस्ट गार्ड', 'नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड' (NTSB), 'अलास्का स्टेट ट्रूपर्स' आणि 'रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर'च्या पथकांचे मनःपूर्वक आभार मानते. या अपघातात प्राण गमावलेले व्यक्ती, त्यांचे शोकाकुल कुटुंबीय आणि 'सिक्युरिटी एव्हिएशन'च्या संपूर्ण टीमसाठी संपूर्ण अलास्का देशवासीय प्रार्थना करत आहेत. दरम्यान, या अपघाताच्या सखोल तपासासाठी NTSB आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे विशेष पथक केप न्यूएनहॅम येथे दाखल झाले असून, दुर्घटनेचे नेमके तांत्रिक कारण शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.