ढाका: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गाझीपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या लिटन चंद्र घोष (वय 55) या हिंदू मिठाई व्यावसायिकाची एका कुटुंबाने फावड्याने वार करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी एका हिंदू तरुणाला कारने चिरडल्याची घटना ताजी असतानाच, अवघ्या 24 तासांत घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
वादाचे रूपांतर रक्तरंजित खेळात
मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूरमधील बारानगर रोड भागात लिटन घोष यांचे बैसाखी स्वीटमीट अँड हॉटेल नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता मासूम मिया नावाचा तरुण दुकानात आला आणि दुकानातील 17 वर्षीय कर्मचारी अनंत दास याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मासूमने अनंतला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच मासूमचे आई-वडील मोहम्मद आणि माजेदा खातून घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनीही अनंतवर हल्ला चढवला. पाहता पाहता हा वाद हिंसक वळणावर गेला.
रक्षणकर्त्याचाच शेवट; फावड्याने केले सपासप वार
आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी मालक लिटन घोष मध्यस्थी करण्यासाठी धावून आले. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा मोर्चा थेट घोष यांच्याकडे वळवला. मासूम मिया, मोहम्मद आणि माजेदा खातून यांनी हातात असलेल्या फावड्याने घोष यांच्यावर सपासप वार केले. डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर जखमांमुळे लिटन घोष यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार हा हल्ला अत्यंत क्रूर आणि अमानुष होता.
जमावाचा संताप आणि पोलिसांची कारवाई
घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिन्ही आरोपींना पकडले आणि संतप्त जमावाने त्यांना मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस अधिकारी मोहम्मद झाकीर हुसैन यांनी घटनेला दुजोरा देत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या हत्येमुळे गाझीपूरमधील हिंदू व्यापारी वर्गात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
24 तासांत दोन हिंदूंची हत्या; दहशतीचे सावट
बांगलादेशातील हिंदू समाजासाठी मागील 48 तास अत्यंत भीषण ठरले आहेत. 16 जानेवारी रोजी पेट्रोल पंपावर केवळ पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून रिपन साहा या हिंदू तरुणाला लँड क्रूझर कारखाली चिरडून ठार मारण्यात आले होते. त्या घटनेला 24 तासही उलटत नाहीत, तोच लिटन चंद्र घोष यांची निर्घृण हत्या झाली.
एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, “कुंपणानेच शेत खाल्ल्यावर दाद कोणाकडे मागायची?” असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.