Akshaya Tritiya 2025:अक्षय्य तृतीया म्हणजे अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारे शुभफल. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष स्थान आहे. यंदाची अक्षय तृतीया अद्भुत योग घेऊन आली आहे. बुधवारी रोहिणी नक्षत्र, शोभन योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग एकत्र येत असल्यामुळे या दिवशी केलेले प्रत्येक पुण्यकर्म हजारपटीने वाढून शाश्वत फळ देणारे ठरेल, असं ज्योतिष सांगतात. त्यामुळे या दिवशी जप, तप, हवन, दान व उपवास यांना विशेष महत्त्व असून, प्रत्येक श्रद्धाळूने हा दिवस आत्मिक प्रगतीसाठी व आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी वापरावा.
धार्मिक ग्रंथांनुसार, याच दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली होती. जैन परंपरेनुसार, भगवान ऋषभदेव यांनी वर्षभराचे कठोर व्रत संपवून राजा श्रेयांशकडून मिळालेल्या इक्षुरसाने आपले उपवास पूर्ण केले. या घटनेमुळेच अन्नदानाला या दिवशी सर्वोच्च स्थान आहे. अन्न, पाणी आणि औषध यांचे दान केल्याने आरोग्य, आनंद आणि अध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करून त्यांचे आशीर्वाद मिळवणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
हेही वाचा: Akshaya Tritiya 2025:आज अक्षय्य तृतीयेनिमित्त 'या' राशींना मिळणार विशेष लाभ
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. परंतु, सर्वांना ते शक्यच असेल असे नाही. त्यामुळे ज्योतिषांचे मत आहे की, मातीची भांडी, तांदूळ, गहू, गूळ, तूप, दूध, साखर, खीर यांसारख्या वस्तूंचे दान केल्यानेही तेवढ्याच पुण्याचा लाभ मिळतो. या पुण्यकार्यात सहभागी होणे केवळ या जन्मातीलच नव्हे, तर आत्म्याच्या प्रवासातही दीपस्तंभ ठरते. आजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण समाजासाठी देणं, आणि त्या माध्यमातून आत्मिक समाधान प्राप्त करणं, हाच खऱ्या अर्थाने ‘अक्षय’ संपत्तीचा अनुभव आहे.
अक्षय तृतीयेला दान करण्यासाठी योग्य वस्तू….
अन्नदान – तांदूळ, डाळ, पीठ, गहू, इत्यादी धान्ये दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
वस्त्रदान – पांढरे कपडे किंवा नवीन कपडे दान करणे शुभ मानले जाते.
पाणी – पाण्याने भरलेले भांडे किंवा कलश दान करणे शुभ मानले जाते.
सोन्या-चांदीच्या वस्तू – सोन्या-चांदीचे दागिने, नाणी, किंवा वस्तू दान करणे शुभ मानले जाते.
विशिष्ट वस्तू – दूध, दही, साखर, खीर, शंख, इत्यादी वस्तू दान करणे देखील शुभ मानले जाते.
पाळलेल्या प्राण्यांसाठी – पाळलेल्या प्राण्यांसाठी अन्न आणि पाणी दान करणे देखील शुभ मानले जाते.
गरजू लोकांना मदत – गरजू लोकांना कपडे, अन्न, पाणी, इत्यादी मदत करणे शुभ मानले जाते.
(वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.