Nidhi Agarwal Viral Video: चित्रपटसृष्टीतील कलाकारांना चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि लोकप्रियता ही नवी बाब नाही. मात्र, काही वेळा हीच चाहत मर्यादा ओलांडून कलाकारांसाठी गंभीर समस्या निर्माण करते. असाच एक धक्कादायक प्रकार प्रभासची सहकलाकार आणि अभिनेत्री निधी अग्रवालसोबत घडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निधी अग्रवाल लवकरच प्रभाससोबत “द राजा साहब” या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, अलीकडेच हैदराबाद येथे एका गाण्याच्या लाँच कार्यक्रमासाठी ती उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी तिचे जोरदार स्वागत केले, मात्र कार्यक्रम संपल्यानंतर परिस्थिती बिघडली.
कार्यक्रमातून बाहेर पडताना निधीला मोठ्या जमावाने वेढले. व्हायरल झालेल्या सुमारे 31 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये निधी अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत असून, गर्दी तिच्याजवळ येत अयोग्य वर्तन करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ती ड्रेसने स्वतःला झाकताना दिसते. काही जणांकडून अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला जात आहे. कसं तरी निधी आपल्या गाडीपर्यंत पोहोचते, गाडीत बसल्यानंतर दरवाजा बंद करते आणि त्यानंतरच तिला थोडा दिलासा मिळतो. व्हिडिओच्या शेवटी ती घाबरलेल्या आवाजात, ‘हे काय होते?’ असा प्रश्न विचारताना दिसते.
Actress Nidhi Agarwal Mobbed at Hyderabad Lulu Mall during the song launch of her upcoming film 'The Raja Saab', co-starring Prabhas.#NidhiAgarwal #TheRajaSaab #Lulumall #Hyderabad pic.twitter.com/VPV106HCPB — Bharat Squad (@TheBharatSquad) December 18, 2025
हेही वाचा – Rakhi Sawant On Nitish Kumar: ‘मी तुमचं धोतर खेचलं तर…’; नितीश कुमार यांच्या ‘त्या’ कृतीवर राखी सावंत भडकली
या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक युजर्सनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. एका युजरने लिहिले, ‘प्राण्यांनाही यापेक्षा चांगले वागवले जाते.’ तर दुसऱ्याने म्हटले आहे की, ‘चाहते असण्याचा अर्थ मर्यादा ओलांडणे नाही.’ प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपाद यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘हा तरसापेक्षाही वाईट वागणारा पुरुषांचा गट होता.’ अनेकांनी निधीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत आयोजक आणि सुरक्षा व्यवस्थेवरही टीका केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.