वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरताना “टँक फुल करा” असे सांगणे अनेकांची सवय असते. मात्र असे संगणे जरी सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ही गोष्ट वाहनासाठी नुकसानदायक ठरू शकते. वाहन उत्पादक कंपन्या प्रत्येक गाडीची इंधन टाकी विशिष्ट मर्यादेनुसार तयार करतात, आणि त्या मर्यादेपेक्षा अधिक इंधन भरणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
प्रत्यक्षात, कंपन्या ज्या क्षमतेची माहिती देतात, त्यापेक्षा टाकीत थोडी अतिरिक्त जागा ठेवलेली असते. ही जागा इंधनाच्या प्रसरणासाठी आणि वायुवीजनासाठी महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, एखाद्या गाडीची टाकी 10 लिटरची असल्याचे सांगितले जाते, पण त्यात थोडी अतिरिक्त जागा राखून ठेवलेली असते. जर आपण वारंवार टाकी पूर्ण क्षमतेपेक्षा जास्त भरून घेतली, तर ही आवश्यक जागा संपून जाते.
यामागील सर्वात मोठा धोका तापमानाशी संबंधित आहे. पेट्रोल पंपावर इंधन भूमिगत टाक्यांमध्ये साठवलेले असल्याने ते तुलनेने थंड असते. मात्र बाहेर काढल्यानंतर आणि वाहनाच्या टाकीत भरल्यानंतर त्याचे तापमान वाढू लागते. तापमान वाढल्याने इंधन प्रसरण पावते आणि टाकीत अतिरिक्त दाब निर्माण होतो. जर टाकी आधीच पूर्ण भरलेली असेल, तर हा दाब गळतीस कारणीभूत ठरू शकतो.
याशिवाय, प्रत्येक इंधन टाकीत एक प्रकारची ‘एअर स्पेस’ किंवा रिकामी जागा असते, जी इंधनातून निर्माण होणाऱ्या वायूंना संतुलित ठेवण्याचे काम करते. टाकी पूर्ण भरल्यास ही जागा नष्ट होते. त्यामुळे वायूंचा दाब योग्यरीत्या नियंत्रित होत नाही, ज्याचा परिणाम इंजिनच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो.
इंधन टाकी ओव्हरफिल केल्यामुळे गाडीच्या परफॉर्मन्सवरही नकारात्मक परिणाम दिसू शकतो. इंजिनची कार्यक्षमता कमी होणे, मायलेजमध्ये कमी होणे आणि प्रदूषण वाढणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ ही सवय कायम ठेवल्यास वाहनाच्या काही भागांवर ताण येऊन दुरुस्तीचा खर्चही वाढू शकतो.
एकूणच, “टँक फुल” करण्याची सवय टाळून, कंपनीने दिलेल्या मर्यादेतच इंधन भरवणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. यामुळे केवळ वाहनाचे आयुष्य वाढत नाही, तर तुमचा प्रवासही अधिक सुरक्षित होतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.