Aurangzeb Silver Coins: समुद्राच्या अथांग लाटांखाली 300 वर्षांपासून दडलेला एक ऐतिहासिक खजिना अखेर जगासमोर आला आहे. मुघल काळातील जगप्रसिद्ध वास्तू 'ताजमहाल'शी संबंधित असलेली ही संपत्ती श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ स्कुबा डायव्हिंग करताना सापडली आहे. सुप्रसिद्ध लेखक आर्थर सी. क्लार्क यांनी 1963 मध्ये या दुर्मिळ खजिन्याचा शोध लावला होता, ज्यावर आता रॉबर्ट नावाच्या व्यक्तीने तयार केलेल्या माहितीपटामुळे (Documentary) पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ मुघल नाण्यांचा साठा
'द सन'च्या अहवालानुसार, आर्थर सी. क्लार्क श्रीलंकेच्या समुद्रात डायव्हिंग करत असताना त्यांना एका बुडालेल्या जहाजाचे अवशेष सापडले. या जहाजाच्या सांगाड्यात मुघल सम्राट औरंगजेब याच्या काळातील चांदीच्या नाण्यांचा प्रचंड साठा आढळून आला. ही नाणी प्रामुख्याने 1701 आणि 1702 या वर्षांत पाडण्यात आली होती, जेव्हा औरंगजेबाची सत्ता शिखरावर होती. या मोहिमेत सुमारे 1,000 चांदीची नाणी हस्तगत करण्यात आली असून, त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत 7,00,000 डॉलर्स (सुमारे 6.5 कोटी रुपये) इतकी आहे.
मसाल्यांचा व्यापार आणि जहाजाचा अपघात
'कॅनन बीच ट्रेझर'च्या माहितीनुसार, 300 वर्षांपूर्वी एक भारतीय व्यापारी सुरत बंदरातून पूर्वेच्या दिशेने मसाल्यांच्या व्यापारासाठी निघाला होता. या जहाजावर औरंगजेबाच्या आदेशाने पाडलेल्या चांदीच्या 'रुपया' चलनाच्या अनेक पिशव्या होत्या. प्रत्येक पिशवीत 1,000 नाणी होती. मात्र, सिलोनच्या (श्रीलंकेचे जुने नाव) किनाऱ्याजवळ एका नैसर्गिक आपत्तीमुळे हे जहाज समुद्रात बुडाले. हे जहाज कधीच परतले नाही आणि तो खजिनाही मुघल साम्राज्यापर्यंत पोहोचू शकला नाही.
हेही वाचा – Air India चा प्रवास महागणार! 8 एप्रिलपासून विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर
ताजमहाल आणि मुघल चलन
ताजमहालचे बांधकाम मुघल शासक शाहजहाँ याने आपली पत्नी मुमताज महल हिच्या स्मृतीप्रित्यर्थ केले होते, ज्याला पूर्ण होण्यास 20 वर्षांचा कालावधी लागला. शाहजहाँचा मुलगा औरंगजेब याने नंतर सत्ता हस्तगत केली होती. भारतात चांदीचा 'रुपया' चलनात आणण्याची पद्धत अफगाण शासक शेरशाह सुरी याने सुरू केली होती, जी पुढे मुघलांनी आणि ब्रिटिशांनीही कायम ठेवली. आजचा भारतीय रुपया याच ऐतिहासिक व्यवस्थेवर आधारलेला आहे. समुद्रात सापडलेला हा खजिना मुघल काळातील आर्थिक संपन्नतेचा एक जिवंत पुरावा मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.