FSSAI Notice to 150 Food Brands: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थ बनवणाऱ्या देशातील 150 हून अधिक आघाडीच्या कंपन्यांना कडक नोटीस बजावून दणका दिला आहे. अन्न पदार्थांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि वेष्टनावरील (Labeling) नियमांचे पालन न केल्याप्रकरणी अलिकडच्या काही महिन्यांत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची सविस्तर माहिती एफएसएसएआयने (FSSAI) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसिद्ध केली आहे.
नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह प्रमुख दिग्गजांचा समावेश; एनर्जी ड्रिंक्स ब्रँड्सवर विशेष कारवाई
या धडक कारवाईच्या जाळ्यात देशातील अनेक नावाजलेल्या आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या अडकल्या आहेत. यामध्ये नेस्ले इंडिया, पेप्सिको, कोका-कोला इंडिया, अॅबॉट इंडिया, मॉन्डेलीझ इंडिया, फेरेरो इंडिया, रेड बुल आणि मॉन्स्टर एनर्जी यांसारख्या बड्या ब्रँड्सचा प्रामुख्याने समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडिया आणि बीटीच्या रिपोर्टनुसार, विशेषतः ऊर्जा पेये (Energy Drinks) आणि अल्कोहोलयुक्त पेये तयार करणाऱ्या कंपन्यांच्या नियमोल्लंघनावर कठोर पावले उचलत त्यांच्या अनेक उत्पादनांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सलाही दणका; अॅमेझॉनच्या एका गोदामाचा परवाना रद्द
केवळ उत्पादक कंपन्यांवरच नव्हे, तर ऑनलाइन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवरही प्राधिकरणाची करडी नजर आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना नियमभंगाबाबत 12 नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर गंभीर त्रुटी आढळल्यामुळे अॅमेझॉनच्या एका गोदामाचा परवानाही (Warehouse License) रद्द करण्यात आला असल्याचे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Tukaram Munde: ठाण्यात FDA कारवाईत अडथळा; आयुक्त तुकाराम मुंडे यांची निवृत्त सहआयुक्तांना कारणे दाखवा नोटीस
रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड चान्सवर कारवाई; डॉमिनोजचे 5 परवाने निलंबित
प्रसिद्ध फास्ट फूड रेस्टॉरंट्स आणि कॉफी चेन आस्थापनांवरही प्राधिकरणाने मोहीम उघडली आहे. यात केएफसी (KFC), मॅकडोनाल्ड्स (McDonald's), पिझ्झा हट, डॉमिनोज आणि कोस्टा कॉफी यांसारख्या 30 हून अधिक प्रसिद्ध रेस्टॉरंट्सना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे डॉमिनोजच्या 5 उपाहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
नोटीसनंतर ब्रँड्सकडून सुधारणा सुरू; ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एफएसएसएआय तत्पर
गेल्या वर्षी एफएसएसएआयने अनेक पंचतारांकित हॉटेल्सवरही अशाच प्रकारची कारवाई केली होती. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या कडक कायदेशीर नोटिसा आणि कारवाईनंतर आता अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या जाहिराती, दावे आणि लेबलिंगमध्ये सुधारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि अन्न सुरक्षेचे नियम कठोरपणे लागू करण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.