IndiGo CEO Resigns : इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा राजीनामा! इंडिगोच्या यशात मोठं योगदान, पण…

एल्बर्स यांनी राहुल भाटिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इंडिगोच्या विकास प्रवासाचा भाग असणे हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
IndiGo CEO Resigns : इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा राजीनामा! इंडिगोच्या यशात मोठं योगदान, पण…

IndiGo CEO Resigns : देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी असलेल्या इंडिगोच्या (IndiGo) मुख्य कार्यकारी पदावरून (CEO) पीटर एल्बर्स यांनी अचानक राजीनामा दिला आहे. मंगळवारी (10 मार्च 2026) इंटरग्लोब एव्हिएशनने शेअर बाजार फायलिंगद्वारे ही माहिती दिली. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे एल्बर्स यांनी नमूद केले असून, आता कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया अंतरिम काळासाठी एअरलाइनची धुरा सांभाळणार आहेत.

पीटर एल्बर्स यांचा यशस्वी पण वादग्रस्त कार्यकाळ
पीटर एल्बर्स यांनी सप्टेंबर 2022 मध्ये इंडिगोच्या सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिगोने मोठी प्रगती केली आणि कंपनीचा महसूल 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला. इतकेच नाही तर, विमानांचा ताफा वाढवून 440 पेक्षा जास्त करण्यात आला आणि कंपनीने 500 एअरबस A320 फॅमिली विमानांची ऐतिहासिक ऑर्डरही दिली. मात्र, त्यांच्या या यशस्वी प्रवासाला डिसेंबर 2025 मध्ये आलेल्या एका मोठ्या ऑपरेशनल संकटाने गालबोट लावले, ज्याचा परिणाम त्यांच्या राजीनाम्यावर झाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – SC On Frivolous Petition: ‘इंग्रजी परीक्षेत 30 गुण मिळवून दाखवा, मगच चौकशी करू’; सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला भर न्यायालयात झापलं

डिसेंबरमधील ‘ते’ संकट आणि विक्रमी दंड
3 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत इंडिगोला प्रचंड गोंधळाचा सामना करावा लागला होता. या काळात 2,500 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, तर 1,900 उड्डाणांना विलंब झाला. यामुळे सुमारे 3 लाख प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या गंभीर निष्काळजीपणासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोवर 22.20 कोटी रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला होता. तसेच पीटर एल्बर्स यांना वैयक्तिकरित्या ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती, ज्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.

राहुल भाटिया यांच्याकडे अंतरिम जबाबदारी
पीटर एल्बर्स 10 मार्च 2026 रोजी आपली सेवा पूर्ण करून पदावरून मुक्त होत आहेत. त्यांच्या जाण्यानंतर इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक आणि को-फाउंडर राहुल भाटिया एअरलाइनचे दैनंदिन कामकाज पाहणार आहेत. एल्बर्स यांनी राहुल भाटिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इंडिगोच्या विकास प्रवासाचा भाग असणे हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. मात्र, तांत्रिक बिघाड आणि विमानांच्या उड्डाणात झालेला गोंधळ यामुळे कंपनीच्या प्रतिमेला पोहोचलेला धक्का सावरण्याचे मोठे आव्हान आता राहुल भाटिया यांच्यासमोर असणार आहे.

हेही वाचा – NCERT Apology : ‘सर्वोच्च फटकार’ बसल्यानंतर ‘त्या’ धड्यावरून NCERT ची बिनशर्त माफी! 8 वीचे संपूर्ण पुस्तक घेतले मागे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version