Weather Update: 25 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर देशाच्या हवामानात मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात. भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ. अमित भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात दोन स्वतंत्र हवामान प्रणाली सक्रिय होत असून त्याचा व्यापक परिणाम अनेक राज्यांमध्ये जाणवणार आहे. गेल्या काही दिवसांत कमी झालेली थंडी आणि वाढलेली ओलसरता आता पुन्हा एकदा बदलणार असून, देशाच्या काही भागांत मुसळधार पावसाचा तर काही भागांत थंडीचा जोर वाढणार आहे.
दक्षिण भारतात अतिवृष्टीचा इशारा
अंदमान समुद्रावर निर्माण झालेल्या वेलमार्क लो प्रेशर एरिया आणि 25 नोव्हेंबरला कोमोरीन–श्रीलंका किनारपट्टी परिसरात निर्माण होऊ शकणाऱ्या दुसऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतात हवामान ढवळून निघणार आहे. या दोन सिस्टीममुळे तामिळनाडू, केरळ आणि अंदमान–निकोबार बेटांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत तर ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तामिळनाडूने आधीच मुसळधार पावसाचा फटका बसलेला असून, गेल्या 24 तासांत 20 सेंमीपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी नोंदला गेला आहे. तसेच आंध्र किनारपट्टी, लक्षद्वीप बेटे आणि रायलसीमा भागांमध्येही ‘यलो अलर्ट’खाली जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा थंडीची एंट्री
दक्षिणेत पावसाची धडाकेबाज हजेरी असताना महाराष्ट्रात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे. हवामान विभागानुसार, राज्यात पुढील चार दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गारठा वाढेल. गेल्या आठवड्यापासून अचानक कमी झालेली थंडी पुन्हा एकदा आपला जोर दाखवू शकते.
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून दमट हवामान कायम असून, थंडी जवळपास गायब झाली होती. परंतु नोव्हेंबरअखेरपासून तापमानात सौम्य घट होऊन डिसेंबरमध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतात तापमानात घट, धुक्याची चाहूल
उत्तर-पश्चिम भारतातही हवामानात बदल अपेक्षित आहेत. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांत किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घट होण्याची शक्यता असून, या भागात हिवाळ्याचा प्रभाव अधिक जाणवेल. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांत दाट धुक्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मच्छिमारांना सावधान! समुद्रात न जाण्याचा सल्ला
बंगालच्या उपसागरात चालू असलेल्या हवामान बदलांमुळे समुद्रात मोठ्या लाटा आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस मच्छिमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा कडेकोट सल्ला देण्यात आला आहे. जे मच्छिमार आधीच समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परतण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
काय अपेक्षित?
दक्षिणेत पावसाचे संकट, मध्य आणि पश्चिम भारतात वाढती थंडी, उत्तरेत धुके देशभरातील हवामानात येणारे बदल नागरिकांनी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. थंडीचे कपडे, प्रवासाचे नियोजन आणि मच्छिमारांनी सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.