टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाने आणखी एक संस्मरणीय विजय नोंदवत उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सुपर-8 लढतीत भारताने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव करत मोठी झेप घेतली. या विजयासह भारताने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दमदार प्रवेश केला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला शिस्तबद्ध मारा केला. तरीही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत 20 षटकांत 195 धावांचा भक्कम डोंगर उभारला. मधल्या फळीत काही महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या, मात्र शेवटच्या षटकांत कॅरिबियन फलंदाजांनी वेग वाढवत भारतासमोर मोठं लक्ष्य ठेवलं.
196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात मिश्र स्वरूपाची ठरली. काही फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने दबाव वाढला. मात्र त्यानंतर संजू सॅमसनने जबाबदारी स्वीकारत आक्रमक आणि संयमी अशा दोन्ही प्रकारची फलंदाजी केली. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादव याची महत्त्वपूर्ण साथ लाभली. दोघांनी मिळून डाव सावरत धावगती कायम ठेवली.
सॅमसनने मैदानाच्या सर्व बाजूंना फटकेबाजी करत प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्याने शेवटपर्यंत नाबाद राहत 97 धावांची खेळी साकारली. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे भारताला शेवटच्या षटकात विजयाचा टप्पा गाठता आला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने 5 विकेट्स राखून लक्ष्य पूर्ण केले.
हा पाठलाग केवळ सामनाविजयापुरता महत्त्वाचा नव्हता, तर तो अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने केलेला हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. तसेच आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी ठरली. यापूर्वी हा विक्रम विराट कोहली यांच्या नावावर होता. मधल्या फळीत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्यानेही महत्त्वपूर्ण धावा जोडत विजयाचा पाया मजबूत केला. शेवटच्या टप्प्यात शिवम दुबेने शांत डोक्याने साथ दिली आणि संघाला विजयापर्यंत नेलं.
या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केलं असून आता उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना रंगणार आहे. स्पर्धेतील चारही उपांत्य संघ निश्चित झाले असून आता अंतिम फेरीसाठीची चुरस अधिकच वाढणार आहे. करो किंवा मरोच्या सामन्यात भारतीय संघाने दाखवलेली जिद्द आणि सॅमसनची तडाखेबाज खेळी चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरली. आता सर्वांचे लक्ष सेमीफायनलकडे लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.