Indigo Air India Big Cut in Landing and Parking Charges : केंद्र सरकारने हवाई प्रवास स्वस्त करण्याच्या दृष्टीने आणि विमान कंपन्यांना आर्थिक आधार देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशातील मोठ्या विमानतळांवर आकारल्या जाणाऱ्या विमानांच्या लँडिंग आणि पार्किंग शुल्कामध्ये 25 टक्के कपात जाहीर करण्यात आली आहे. आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ही सवलत लागू असेल, ज्यामुळे वाढत्या खर्चामुळे हैराण झालेल्या विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्राच्या निर्णयामागे ही कारणे
हा निर्णय घेण्यामागे जागतिक परिस्थिती आणि विमान कंपन्यांची मागणी ही प्रमुख कारणे आहेत. इंडिगो आणि एअर इंडिया यांसारख्या कंपन्यांनी शुल्क कमी करण्याची विनंती केली होती. याची दखल एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने घेतली आहे. सध्या भारतीय कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. इराणमधील तणावामुळे इंधनाचे दर वाढले आहेत, तर पाकिस्तानने हवाई क्षेत्र नाकारल्यामुळे विमानांना वळसा घालून जावे लागत आहे. या अतिरिक्त प्रवासाचा मोठा आर्थिक बोजा कंपन्यांवर पडत आहे.
विमान कंपन्यांचे बजेट नियंत्रणात येणार
साधारणपणे विमान कंपन्यांच्या खर्चाचे गणित पाहिले तर इंधन आणि पगारांनंतर विमानतळ शुल्क हा सर्वात मोठा खर्च मानला जातो. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, लँडिंगसाठी द्यावे लागणारे शुल्क बजेटवर मोठा परिणाम करते. आता सरकारने दिलेल्या या सवलतीमुळे कंपन्यांच्या खर्चात बचत होईल. या बचतीचा फायदा प्रवाशांना मिळण्याची शक्यता असून, विमान तिकिटांचे दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मूळ खर्च कमी झाल्यामुळे प्रवाशांवरील आर्थिक ताण कमी होण्याचे संकेत या निर्णयामुळे मिळत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.