Andhra Pradesh Elderly Woman Last Wish : आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील चिंतागुंफला गावच्या मूळच्या रहिवासी असणाऱ्या 94 वर्षीय कोंड्रगुंटा महालक्ष्मीअम्मा (Kondragunta Mahalakshmamma) यांनी पुन्हा एकदा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. सध्या त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. आता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना भारतीय म्हणून मरायचे आहे, ही त्यांची तीव्र इच्छा आहे. यासाठी त्यांनी थेट बापटलाचे जिल्हाधिकारी जे. व्यंकट एम. मुरली यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एक भावनिक साकडे घातले. आपल्या जन्मभूमीतच अंत्यसंस्कार व्हावेत आणि आयुष्यातील उर्वरित काळ भारतातच व्यतीत करता यावा, हीच त्यांची एकमेव मागणी आहे.
18 वर्षांच्या अमेरिकेतील रहिवासानंतर मायदेशी परतल्या
पती नागाभूषणम यांच्या निधनानंतर महालक्ष्मीअम्मा अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील पीटर्सबर्ग येथे राहणारे त्यांचे सुपुत्र आणि कर्करोगतज्ज्ञ (ऑन्कोलॉजिस्ट) बुच्चय्या चौधरी यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. तेथे जुलै 2000 मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आणि जवळपास 18 वर्षे त्या अमेरिकेतच राहिल्या. मात्र, 2018 मध्ये त्यांचे सुपुत्र मंगलागिरी येथील एनआरआय (NRI) रुग्णालयात काम करण्यासाठी भारतात परतले, तेव्हा महालक्ष्मीअम्मा देखील त्यांच्यासोबत आपल्या मूळ गावी परत आल्या.
हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंनी राम मंदिरात दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट गायब; संजय राऊतांनी केली सखोल चौकशीची मागणी
नागरिकत्वासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
महालक्ष्मीअम्मा यांनी आधीच आपल्या अमेरिकेच्या नागरिकत्वाचा त्याग केला असून, भारतीय नागरिकत्वासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती करताना त्या म्हणाल्या, 'कलेक्टर गारू, माझे वय आता 95 वर्षांच्या जवळ आले आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मला भारतीय नागरिक म्हणून माझ्या मातृभूमीत शेवटचे दिवस जगता यावे. मी भारतीय संविधानाचा आदर करेन आणि देशातील सर्व नियमांचे पालन करेन.' त्यांचा हा प्रशासनाला विनंती करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कायदेशीर प्रक्रिया सुरू
या वृद्ध महिलेची भावनिक विनंती ऐकून घेतल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नियमानुसार लवकरात लवकर योग्य ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या अर्जाबाबत आवश्यक ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार केंद्र सरकारकडे महालक्ष्मीअम्मा यांना पुन्हा भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची शिफारस करेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.