Famous Youtuber Tragedy: 200 च्या स्पीडने कार आली अन्…, त्रस्त युट्यूबरने उचललं टोकाचं पाऊल, थरारक व्हिडिओ समोर

इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान 200 किमी वेगात कार डिव्हायडरला धडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Famous Youtuber Tragedy: 200 च्या स्पीडने कार आली अन्…, त्रस्त युट्यूबरने उचललं टोकाचं पाऊल, थरारक व्हिडिओ समोर

मुंबई: चकाकणारं ग्लॅमर, लाखांच्या संख्येने असणारे फॉलोअर्स आणि आलिशान गाड्या… सोशल मीडिया स्टार्सचं आयुष्य बाहेरून जितकं सुखाचं वाटतं, तितकंच ते आतून पोखरलेलं असू शकतं, याची विदारक प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस 18'चा माजी स्पर्धक अनुराग डोभाल, ज्याला जग 'UK07 Rider' म्हणून ओळखते, एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मात्र, हा निव्वळ अपघात नसून स्वतःला संपवण्याचा एक टोकाचा प्रयत्न असावा, अशा चर्चेने सध्या इंटरनेटवर वादळ उठवले आहे.

या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा उलगडा अनुरागच्याच एका इन्स्टाग्राम लाईव्हमुळे झाला. मध्यरात्रीच्या सुमारास अनुराग तब्बल 200 किमी प्रति तास या जीवघेण्या वेगाने त्याची कार चालवत होता. लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तो अत्यंत भावूक दिसत होता. "आयुष्यात आपली माणसंच राहिली नाहीत, तर फोन तरी कोणाला करू… आई, पुढच्या जन्मी तरी प्रेम दे," असे काळीज पिळवटून टाकणारे शब्द उच्चारल्यानंतर काही क्षणांतच त्याने आपली कार वेगात डिव्हायडरला ठोकली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अनुरागच्या या टोकाच्या पावलाच्या मुळाशी त्याचे विस्कळीत झालेले खासगी आयुष्य असल्याचे बोलले जात आहे. एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्लॉगमध्ये त्याने कौटुंबिक संघर्षाचा पाढा वाचला होता. दुसऱ्या जातीच्या मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर प्रचंड नाराज होते. हे वादाचे मोहोळ इतके टोकाला गेले की, अनुरागने आपल्या रक्ताच्या माणसांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. घराची दारे बंद झाल्यानंतर आणि नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: IND vs NZ T20 World Cup: भारत-न्यूझीलंड फायनलआधी चाहत्यांना धक्का; स्टार खेळाडूच्या 15 वर्षांच्या कारकीर्दीला ब्रेक

मात्र, या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे. अनुरागचा भाऊ कलाम याने सोशल मीडियावर काही खळबळजनक स्क्रीनशॉट्स शेअर करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. "हे सर्व केवळ 'व्ह्यूज' मिळवण्यासाठी रचलेलं नाटक आहे," असा दावा कलामने केला आहे. अनुराग त्याच्या पत्नीला मारहाण करायचा आणि याच छळाला कंटाळून ती त्याला सोडून गेली, असा धक्कादायक खुलासाही कलामने केला आहे. त्यामुळे, जो अनुराग स्वतःला पीडित म्हणून जगासमोर मांडत होता, त्याच्या प्रतिमेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एकीकडे अनुरागच्या प्रकृतीसाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत, तर दुसरीकडे हा प्रसिद्धीसाठी केलेला 'पब्लिसिटी स्टंट' असल्याची टीकाही होत आहे. सोशल मीडियाच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती जीवाशी असा खेळ खेळू शकते का? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. 'लोभसवाण्या जगाची अंधारी बाजू' म्हणून या घटनेकडे पाहिले जात असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल, मात्र या निमित्ताने नात्यांमधील संवाद आणि मानसिक आरोग्य या विषयांवर पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अनुराग डोभालचे हे प्रकरण डिजिटल युगातील आभासी सुख आणि वास्तवातील दुःख यांमधील दरी स्पष्ट करणारे ठरले आहे. 

हेही वाचा: Pickle Factory Accident: लोणचे कारखान्यात काळाचा घाला; टाकीत उतरणं ठरलं जीवघेणं, गुदमरून मालकासह मुलाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version