Siddharth Jadhav Fake Death News: आपल्या खुसखुशीत अभिनय आणि कॉमेडी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्याने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली. एका युट्यूब चॅनेलवर ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार’ अशा शीर्षकाखाली खोटी बातमी चालवली जात होती. स्वतःच्याच निधनाची ही बातमी पाहताच सिद्धार्थ जाधव चांगलाच संतापला आणि त्याने इन्स्टाग्रामवर थेट व्हिडीओ शेअर करत मोबाईलचा स्क्रीन दाखवून या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला.
‘मी ठणठणीत बरा आहे’; अफवा पसरवणाऱ्यांची कानउघाडणी; चाहत्यांना दिलासा
व्हिडीओमध्ये सिद्धार्थने हसत आणि संताप व्यक्त करत स्वतःच्या मृत्यूची बातमी पसरवणाऱ्या चॅनेल्सची कानउघाडणी केली. ‘मी एकदम ठणठणीत बरा असून माझ्या कामात व्यस्त आहे, एवढी कसली घाई आहे?’ असा सवाल करत त्याने सर्व अफवांना पूर्णविराम दिला. या व्हिडीओवर त्याचे चाहते आणि नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स करत अशा खोट्या बातम्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सिद्धार्थ जाधवची पोस्ट
नमस्कार
मी ठणठणीत बरा आहे. व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग, धिंगाणाचं shoot suru aahe…
ज्या ज्या लोकांनी काळजीने msg /call केलेत, त्यांना मनापासून धन्यवाद!
बातमीदार जरा मला तरी विचारा…एवढी कसली घाई आहे तुम्हाला???
ज्याने Headline /coverage बनवलाय, त्याला तर Nobel द्याच…
Man is a more dangerous Animal than an ‘ANIMAL’
(त्यांचं जाऊ दे, निदान माझ्या नाटकाचं तरी promotion करतो. News वाले या माझ्या नाटकाला 26 ऑगस्ट 8 वा. छत्रपती शिवाजीमंदिर दादर ला.)
‘ॲनिमल’ नाटक आणि ‘आता होऊ दे धिंगाणा 5’ मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा सिद्धार्थ जाधव सध्या त्याच्या ‘ॲनिमल’ या नाटकामुळे चर्चेत आहे. याशिवाय, तो लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आता होऊ दे धिंगाणा 5’ या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शो 29 ऑगस्ट पासून दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:00 वाजता प्रसारित होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.