मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता दुबईमध्ये होणारे शूटिंग रद्द करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. कलाकार आणि तांत्रिक पथकाच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटातील एक महत्त्वाचा ॲक्शन सीन दुबई येथील वाळवंटात चित्रित करण्याचे नियोजन होते. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि आवश्यक परवानग्याही मिळाल्या होत्या. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेवटच्या क्षणी हे शूटिंग रद्द करण्यात आले.
या सीनमध्ये सुहाना खान आणि अनिल कपूर यांचाही सहभाग होता. आता दुबईसारखा वाळवंटी सेट मुंबईतील विले पार्ले येथील स्टुडिओमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या ठिकाणीच हा ॲक्शन सीक्वेन्स चित्रित केला जाणार आहे.
चित्रपटाचे शूटिंग वेळेत पूर्ण व्हावे यासाठी निर्मात्यांनी शेड्यूल पुढे ढकलण्याऐवजी लोकेशन बदलण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे ‘किंग’च्या निर्मितीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘किंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटातून सुहाना खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करत असून अभिषेक बच्चनचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे.
दरम्यान, 2025 पासून सुरू असलेल्या या चित्रपटाचे काही भाग मुंबईसह युरोपमध्येही चित्रित करण्यात आले आहेत. ‘किंग’ हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.