मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा गेल्या अनेक वर्षांपासून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमामुळे अनेक गुणी कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध झाले. त्या कलाकारांनीही या संधीच सोनं केलं. त्यातलाच एक प्रसिद्ध कलाकार म्हणजे ओंकार भोजने. हास्यजत्रेच्या सुरुवातीच्या सीजनपासून कार्यक्रमाशी जोडला गेलेला ओंकार भोजने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. 'अगं अगं आई…', 'इलेक्ट्रिशन तात्या', 'वनिताशी भांडणारा गौरवचा मामा…', यासारख्या अनेक भूमिकांमध्ये ओंकारनं आपली छाप सोडली. त्याच्या या भूमिका आणि डायलॉग रसिकांच्या मनात घर करून गेल्या. मात्र काही काळानंतर ओंकारनं हा कार्यक्रम सोडला आणि इतर वाहिन्यांमधील कार्यक्रमांमध्ये दिसू लागला. परंतू आता पुन्हा एकदा ओंकार भोजने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ओंकारनं आगामी एपिसोडच्या चित्रीकरणास सुरूवात केली असल्याचे समजते.
ओंकार भोजनेनं हास्यजत्रेतून ब्रेक घेतल्यानंतर 'झी मराठीवरील चला हवा येऊ द्या…', कार्यक्रमात काम केले. दरम्यान, त्यानं काही मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. प्रसाद खांडेकर लिखित-दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा…' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओंकार भोजने हास्यजत्रेच्या एका एपिसोडमध्ये आला असता, त्याला सहकलाकारांनीही पुन्हा कार्यक्रमात 'येऊन तर बघ…', अशी साद घातली. अखेर ओंकारनं हास्यजत्रेत पुन्हा काम करण्यास तयारी दर्शवली असून लवकरच तो हास्यजत्रेच्या एपिसोडमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.