Namdeo Dhasal Biopic: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका बहुचर्चित बायोपिकची जोरदार चर्चा सुरू आहे. दलित पँथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, आणि आता त्याचा पहिला लुक समोर आल्यानंतर ही उत्सुकता अधिकच वाढली आहे.
या चित्रपटात नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून ललितचा एक वेगळाच, तडफदार आणि बंडखोर अवतार पाहायला मिळतो. त्यांच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
‘ढसाळ’ हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा सिनेमा केवळ एक बायोपिक नसून एका विद्रोही विचारवंताचा संघर्ष, त्यांची भूमिका आणि समाजातील अन्यायाविरोधात उभा राहिलेला लढा प्रभावीपणे मांडणार आहे. ढसाळ यांच्या कवितेतून व्यक्त झालेला संताप, असंतोष आणि परिवर्तनाची ज्वाला पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन वरुणा राणा यांनी केले असून संवादांची जबाबदारी प्रताप गंगावणे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे दाक्षिणात्य संगीतविश्वातील दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांचं संगीत. त्यांच्या संगीतामुळे चित्रपटाला वेगळंच वजन मिळणार असल्याचं मानलं जात आहे. तसेच, गुरू ठाकूर आणि इर्शाद कामील यांनी गीतलेखन केलं आहे.
या चित्रपटासाठी ललित प्रभाकरने केलेली तयारी विशेष उल्लेखनीय आहे. एका वेगळ्या विचारसरणीच्या, आक्रमक आणि अस्वस्थ करणाऱ्या व्यक्तिमत्त्वात शिरणं हे मोठं आव्हान होतं, असं ललितने सांगितलं आहे. नामदेव ढसाळ यांच्या विचारांची खोली आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष समजून घेण्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे.
चित्रपटातील ललितचा लूक साकारण्यासाठी प्रसिद्ध रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मते, ढसाळ यांचं व्यक्तिमत्त्व पडद्यावर जिवंत करण्यासाठी केवळ बाह्य रूप बदलणं पुरेसं नसून त्यांच्या भावना आणि विचारांचे प्रतिबिंब दाखवणं आवश्यक होतं.
‘ढसाळ’ हा सिनेमा केवळ एक व्यक्तीची कहाणी नसून, समाजातील अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका चळवळीचा प्रवास आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ मनोरंजन देणार नाही, तर विचार करायलाही भाग पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.