Archana Patkar: मुंबईत उघडकीस आलेल्या एका धक्कादायक खंडणी प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अभिनेत्री हेमलता पाटकर हिच्या अटकेनंतर, ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत कांचन आजींची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर या देखील चर्चेत आल्या आहेत. हेमलता ही अर्चना पाटकर यांची सून असल्याची माहिती समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये अर्चना यांचे नाव जोडले जात होते. यावर अखेर अर्चना पाटकर यांनी स्वतः पुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेमलता पाटकर हिला दीड कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात तिच्यासोबत अमरिना झवेरी हिचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. नोव्हेंबर महिन्यात अंधेरीतील एका हॉटेलमध्ये घडलेल्या वादानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबीयांशी झालेल्या वादानंतर, विनयभंगाची तक्रार दाखल करून ती मागे घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करत अर्चना पाटकर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पण ठाम पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणतात की, “मी गेली चार दशके अभिनय क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहे. मात्र, या घटनेनंतर काही माध्यमांनी माझं नाव आणि फोटो वापरल्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.”
अर्चना पाटकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा मुलगा गेल्या चार वर्षांपासून हेमलतापासून वेगळा आहे आणि त्यांच्यातील घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या कुटुंबाचा हेमलताशी कोणताही संबंध नाही. या गुन्ह्याशी स्वतःचा किंवा कुटुंबाचा काहीही संबंध नसताना नाव जोडले जाणे चुकीचे असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी सध्या पोलीस कोठडीत असून, गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे सेलिब्रिटी कुटुंबांशी संबंधित बातम्या मांडताना जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.