Sangli Crime: हत्येच्या तयारीत आरोपी, हातात पिस्तुलं आणि जिवंत काडतुसे; पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघड

सांगलीत पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात गंभीर कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना देशी पिस्तुलं आणि जिवंत काडतुसेसह अटक केली आहे.
Sangli Crime: हत्येच्या तयारीत आरोपी, हातात पिस्तुलं आणि जिवंत काडतुसे; पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघड

सांगली-मिरज परिसरात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संघटक तसेच श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि इतर घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कटामागील आणखी एक संशयित सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश चंद्रकांत लोखंडे (वय 33), विराज प्रकाश बुटाले (वय 41) आणि संग्राम संभाजी फडतरे (वय 27  ) यांचा समावेश आहे. न्यायालयाने तिघांनाही पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पथकाला अंकली ते काळीवाट मार्गावर काही संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. तपासादरम्यान संशयितांच्या वाहनातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे आणि एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. वाहनावर बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचेही उघड झाले आहे. गुन्हा करताना ओळख टाळण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वादग्रस्त जमिनीच्या कारणातून कट?

प्राथमिक तपासात या कटामागे जमिनीचा वाद असल्याचे समोर आले आहे. एसबीजीआय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील एका वादग्रस्त जमिनीवरून हा वाद निर्माण झाला होता. संबंधित जमीन चौथ्या संशयिताच्या मालकीची असल्याचा दावा केला जात असून त्या जागेवर संजय भोकरे यांचा कब्जा असल्याने त्यांना हटवण्यासाठी हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात असेही उघड झाले की, आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथून देशी बनावटीची पिस्तुले आणि काडतुसे खरेदी केली होती. त्यानंतर संजय भोकरे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य संधी साधण्याचा प्रयत्न सुरू होता.

‘जनप्रवास’ कार्यालयाबाहेर रेकी केल्याची कबुली

आरोपी विराज बुटाले याने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली. भोकरे हे दैनिक जनप्रवासच्या कार्यालयात कधी येतात, याची माहिती गोळा करून त्यांच्या हालचालींची रेकी करण्यात येत होती. योग्य वेळ मिळताच त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती, अशी कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्य सूत्रधारावर कारवाईची मागणी

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय भोकरे यांनी संबंधित जमीन संस्थेची असल्याचे सांगितले. मालकीहक्काचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या कटामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version