Pune Crime News : ‘ओरडला तर खल्लास करू’; पुण्यात भरदिवसा सराफाच्या गळ्यावर कोयता, काळजाचा ठोका चुकवणारा Video आला समोर

पुण्यातील हडपसरच्या शेवाळवाडी भागात सराफ दुकानात झालेल्या थरारक घटनेनंतर पुणे पोलिसांनी जलद तपास करत सहा आरोपींना अटक केली आहे.
Pune Crime News :  ‘ओरडला तर खल्लास करू’; पुण्यात भरदिवसा सराफाच्या गळ्यावर कोयता, काळजाचा ठोका चुकवणारा Video आला समोर

पुणे: शनिवारची ती नेहमीची सायंकाळ… हडपसरच्या शेवाळवाडी परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ होती. ‘महावीर ज्वेलर्स’मध्ये मालक ग्राहकांशी बोलण्यात मग्न होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, अचानक दुकानाच्या उंबरठ्यावर तीन-चार सावल्या उभ्या ठाकल्या. काही सेकंदांतच हवेत चमकले लांब सडक धारदार कोयते आणि शांत असलेल्या दुकानात मृत्यूचे सावट पसरले. “ओरडला तर खल्लास करू!” या एका धमकीने सराफाचा आवाज घशातच अडकला. अवघ्या काही मिनिटांत लाखो रुपयांचे सोने लंपास करून हे दरोडेखोर वाऱ्याच्या वेगाने पसार झाले, पण जाताना मागे सोडून गेले तो केवळ दहशतीचा थरार!

शेवाळवाडीतील गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या या दुकानात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी पूर्ण नियोजनानुसार ही वेळ निवडली होती. दुकानात सराफ व्यावसायिक एकटेच असल्याचे पाहून चार जण हातात कोयते घेऊन आत शिरले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थरार स्पष्ट दिसत आहे. एक बाजूला जीव वाचवण्यासाठी धडपडणारा सराफ आणि दुसरीकडे निर्घृणपणे दागिने गोळा करणारे गुंड. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडवून दिली होती.

हेही वाचा: CBSE Counseling Support : तज्ज्ञांचा समूह, 24 तास मदत आणि टोल-फ्री क्रमांक; CBSE बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी कसली कंबर; पाहा नवा उपक्रम

गुन्ह्याची गंभीरता ओळखून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने, युनिट दोन, पाच आणि सहाच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना समजले की, आरोपी पुणे सोडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पसार झाले आहेत. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे पोलिसांनी पाठलाग केला आणि राजदीप जगतापसह दोन अल्पवयीन साथीदारांना तिथून बेड्या ठोकल्या.

मुख्य आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात सापळा रचला. प्रवीण महादेव शिंदे (18), राजदीप संतोष जगताप (21) आणि भावेश राजेश चव्हाण (20) यांच्यासह त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अखेर जेरबंद केले. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 224 ग्रॅम सोन्याचे आणि 183 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले असून, तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ‘कोयता गँग’ने उच्छाद मांडला आहे. भररस्त्यात आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे दरोडे पडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला असला, तरी या टोळ्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.

हेही वाचा: Foreign Minister S. Jaishankar : भारत – युरोप संबंधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा परराष्ट्रमंत्र्यांनी केली व्यक्त; म्हणाले, ‘2026 हे वर्ष…’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version