Terror Funding: मदरशांच्या नावाने वर्गणी गोळा करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना फंडिंग; ATS कडून ‘जैश’शी संबंधित तरुणाला बेड्या

या अटकेमुळे भारतविरोधी कारवाया आणि टेरर फंडिंगचे एक मोठे नेटवर्क उघडकीस आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा आणि त्यांना मिळणाऱ्या आर्थिक स्रोतांची सखोल चौकशी होणार आहे.
Terror Funding: मदरशांच्या नावाने वर्गणी गोळा करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना फंडिंग; ATS कडून ‘जैश’शी संबंधित तरुणाला बेड्या

UP ATS Arrests Jaish-e-Mohammed Suspect Mohammad Zafar 2026: उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका 24 वर्षीय संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील बहादूरगड ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेरपूर कुरेशियान मशिदीतून मोहम्मद जफर याला 16 ऑगस्ट 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले. जफर हा मूळचा बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातील रौटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीरगंज गावचा रहिवासी असून, त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद जहीर आहे.

'जैश'चा म्होरक्या मसूद अजहर याच्या भाषणांनी प्रेरित; सोशल मीडियावर जिहादी प्रचार
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, जफर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या प्रक्षोभक भाषणांनी आणि जिहादी विचारांनी अत्यंत प्रभावित झाला होता. तो व्हॉट्सअ‍ॅपवरील अनेक पाकिस्तानी जिहादी ग्रुप्सशी जोडलेला होता आणि याच माध्यमातून तो पाकिस्तानातील दहशतवादी हँडलर्सच्या थेट संपर्कात आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तो लोकांना हिंसक जिहाद आणि खिलाफतच्या विचारांकडे आकर्षित करण्याचा व चिथावणी देण्याचा प्रयत्न करत होता.

मदरशांच्या नावाने निधी संकलन; UPI द्वारे पाकिस्तानला पैशांचे हस्तांतरण
जफर धार्मिक संस्था आणि मदरशांच्या नावाने लोकांकडून मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा करायचा. गोळा झालेला हा निधी तो पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी त्याने बिझनेस अकाऊंट्स आणि काही संशयित व्यक्तींच्या मदतीने अनेकदा UPI द्वारे पैशांचे व्यवहार केले होते, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. आता ATS या आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी करत असून, हा पैसा कोणाकडून आला आणि कुठे पाठवला गेला याचा शोध घेत आहे. जफरच्या अटकेमुळे दहशतवादी जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

हेही वाचा – Indigenous Jet Powered Drone: स्वदेशी बनावटीच्या 'दिव्यास्त्र Mk3' ची यशस्वी गगनभरारी! शत्रूचे बंकर, एअर डिफेन्स सिस्टमसाठी ठरणार कर्दनकाळ

बीएनएस (BNS) आणि युएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल
अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत जफरने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचा दावा ATS ने केला आहे. यानंतर त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 152(1)(2) आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) कलम 18/38 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तपास यंत्रणा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सची, बँक खात्यांची आणि पाकिस्तानातील त्याच्या संपर्कांची कसून चौकशी करत आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तपासाची चक्रे वेगात
या अटकेमुळे भारतविरोधी कारवाया आणि टेरर फंडिंगचे एक मोठे नेटवर्क उघडकीस आले आहे. जफरच्या अटकेनंतर बिहारच्या पूर्णिया आणि उत्तर प्रदेशच्या विविध भागांत तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा आणि त्यांना मिळणाऱ्या आर्थिक स्रोतांचा शोध घेण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाल्या आहेत.

हेही वाचा – Mumbai Navy Sailor Family Update : मुंबईत नौदल जवानासह संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत! पोलिसांच्या हाती लागला 'तो' सुगावा; मृत्यूपूर्वी वडिलांना काय पाठवलं?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version