Maharashtra Crime News: राज्यातील गुन्हेगारी काही थांबेना; आता ‘चादर गँग’चा या शहरात धुमाकूळ

सीसीटीव्हीत चौघांची टोळी दिसली असून त्यात तीन तरुणी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि शाळेतील माहितीचा वापर झाला का, याची चौकशी सुरू आहे.
Maharashtra Crime News: राज्यातील गुन्हेगारी काही थांबेना; आता ‘चादर गँग’चा या शहरात धुमाकूळ

जळगाव शहरात गुन्हेगारीचा एक नवा आणि धक्कादायक चेहरा समोर आला आहे. सावखेडा शिवारात एका रात्रीत चार शाळा फोडून सुमारे दोन लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या ‘चादर गँग’ने संपूर्ण परिसरात भीतीचं सावट निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या टोळीत तरुणींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्यामुळे प्रकरण एक वेगळंच वळण घेत आहे. सावखेडा शिवारातील वर्धमान CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल, गुरुकुल किड्स आणि शानबाग विद्यालय या चार शाळांना या गँगने एका रात्रीत लक्ष्य केले. काही शाळांमध्ये सुरक्षारक्षक उपस्थित असतानाही या चादर गँग टोळीने सहजपणे आत प्रवेश करून विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्ती परीक्षांसाठीची ठेवलेली रक्कम चोरली आहे. या धाडसानं संपूर्ण शिक्षणसंस्थांना सुरक्षेविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये ‘चादर गँग’ कैद

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पाहणी केली. वर्धमान आणि गुरुकुल किड्स या शाळांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तपास अधिक गूढ बनला. कॅमेऱ्यात चार जणांचा गट दिसतोय. सर्वांनी चेहऱ्यावर स्कार्फ आणि खांद्यावर चादर ओढलेली. धक्कादायक बाब म्हणजे यातल्या तीन तरुणी असल्याचा संशय फुटेजच्या आधारे पोलिसांनी व्यक्त केला आहे. राज्यात आधी ‘कोयता गँग’, ‘स्प्रे गँग’ अशा विविध गुन्हेगारी टोळ्या समोर आल्या होत्या. पण जळगावमध्ये प्रथमच ‘चादर गँग’च्या प्रवेशाने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भितीचं वातावरण तयार झालं आहे. तरुणींनीच गुन्हेगारीकडे पाऊल टाकल्याची शक्यता अनेकांना थरकाप उडवणारी ठरत आहे.

हेही वाचा: Raisen Crime Case: अखेर 300 पोलिसांनी प्रयत्न केल्यानंतर सलमानला अटक; सहा वर्षांच्या मुलीवर केला होता अत्याचार

शहरापासून दूर असलेला परिसर, रात्रीचा अंधार आणि सुरक्षिततेतील त्रुटी

सावखेडा शिवार शहरापासून दूर असल्याने रात्रीच्या वेळी शाळेत प्रवेश करणे सोपं आहे. कदाचित म्हणूनच या टोळीने हा परिसर निवडल्याचा अंदाज पोलिसांना आहे. काही शाळांमध्ये सुरक्षारक्षक असतानाही चोरी झाल्याने या प्रकरणात आतल्या माहितीचाही वापर झाला का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

परिसरात दहशत; पोलिसांचा शोधमोहीम सुरू

या मालिकात्मक चोरीनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचा धागा ठरला असून, या चादर गँगचा तपास अतिशय गोपनीय आणि जलद गतीने सुरू आहे. गँग मध्ये नक्की कोण आहे? तरुणीच का या टोळीच्या केंद्रस्थानी? इतकं धाडस कुठून आले? पोलिस तपासात या प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जळगावमध्ये उत्सुकतेसोबतच भीतीचं वातावरणही चांगलंच पसरलं आहे.

हेही वाचा: Mumbai Air Pollution: मुंबईत हवा ‘खराब’; BMC ची 53 साइट्सना स्टॉप-वर्क नोटीस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version