Accident: भरधाव ॲस्टन मार्टिनच्या धडकेत 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू; खासदाराच्या 21 वर्षीय मुलाला अटक नाही

या अपघाताच्या वेळी आलिशान कार चालवणारा चालक आंध्र प्रदेशातील सत्ताधारी जनसेना पक्षाचे राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा 21वर्षीय मुलगा लिंगमनेनी संजूश असल्याचे समोर आले आहे.
Accident: भरधाव ॲस्टन मार्टिनच्या धडकेत 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू; खासदाराच्या 21 वर्षीय मुलाला अटक नाही

Hyderabad Inorbit Mall Aston Martin Accident: माधापूर परिसरातील प्रसिद्ध इनऑर्बिट मॉलसमोर 16 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 3 वाजता एक अत्यंत भीषण अपघात घडला. मॉलमधील ‘लाइफस्टाईल’ स्टोअरमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेली 26 वर्षीय तरुणी भारती मुखी ही तिच्या मैत्रिणीसोबत जेवण आणण्यासाठी बाहेर गेली होती. मॉलसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका आलिशान ॲस्टन मार्टिन कारने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला त्याच कारमधून जुबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले; परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये हा अपघात घडला.

अमेरिकेत शिक्षण घेतलेला 21 वर्षीय खासदारपुत्र संजूश कार चालक
या अपघाताच्या वेळी आलिशान कार चालवणारा चालक आंध्र प्रदेशातील सत्ताधारी जनसेना पक्षाचे राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा 21वर्षीय मुलगा लिंगमनेनी संजूश असल्याचे तपासात समोर आले आहे. माधापूर पोलिसांनी लाइफस्टाईल स्टोअरच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून संजूशविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी आरोपी दारू किंवा कोणत्याही अमली पदार्थांच्या प्रभावाखाली नव्हता.

हेही वाचा – Video : बसच्या ऑटोमॅटिक दरवाजात मान अडकून 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; 15 मिनिटांचे CCTV फुटेज गायब झाल्याने संशय बळावला

पोलिसांकडून बजावण्यात आली फक्त नोटीस
अपघात गंभीर असतानाही आरोपी संजूशला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, दाखल करण्यात आलेले कलम 106(1) हे जामीनपात्र असून यात 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा प्रकरणात थेट अटक न करता नोटीस बजावण्याची तरतूद असल्याने संजूशला चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली ॲस्टन मार्टिन (TG-09-G-0666) कार जप्त करण्यात आली आहे.

ओरिसाची भारती होती कुटुंबाचा एकमेव आधार
21 वर्षीय आरोपी संजूश याने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, डॅलस येथून शिक्षण घेतले असून तो एका ऊर्जा कंपनीचा संचालक आहे. दुसरीकडे, मूळची ओडिशाची असलेली मृत तरुणी भारती ही हैदराबादमध्ये तिच्या आईसोबत राहत होती आणि तीच संपूर्ण कुटुंबाचा मुख्य आर्थिक आधार होती. तिच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा – Crime News : हृदयद्रावक! मोबाईलच्या हट्टापोटी मुलाची डोंगरावरून उडी, वाचवण्याच्या धडपडीत आई-वडिलांचाही अंत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version