Greater Noida Fake GST Officers Robbery: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याच्या 'स्पेशल 26' चित्रपटातील कल्पनेचा वापर करून ग्रेटर नोएडामध्ये तब्बल 25 ते 29 लाखांची लूट घडवून आणणाऱ्या एका भामट्यांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या संदीप नावाच्या एका नामांकित GST कन्सल्टंटला या बनावट टीमने आपले शिकार बनवले होते. आरोपींनी स्वतःला GST अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून संदीप यांच्या कारचा पाठलाग करत ती थांबवली आणि त्यांना लुटलं. यामुळे संदीप यांना मोठा मानसिक धक्का बसला.
7 तास कारमध्ये बनवले ओलीस; 50 लाखांच्या खंडणीची मागणी
ही खळबळजनक घटना 20 जुलै रोजी घडली होती, जेव्हा संदीप आपल्या कारने जात असताना आरोपींनी त्यांना ओव्हरटेक करून अडवले. टोळीतील 2 भामटे पोलिसांच्या खाकी वर्दीत असल्याने संदीप यांना त्यांचा अजिबात संशय आला नाही. GST मध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे सांगून आणि चौकशीसाठी लखनऊला घेऊन जात असल्याचे भासवून आरोपींनी त्यांना स्वतःच्या कारमध्ये तब्बल 7 तास ओलीस ठेवले. या 7 तासांच्या प्रवासात आरोपींनी जिवे मारण्याची आणि एन्काउंटरची धमकी देत सुरुवातीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली, ज्याचा सौदा अखेर 29 लाख रुपयांवर निश्चित झाला.
तब्बल 2.5 वर्षे केली रेकी; नातेवाइकांकडून मागवले पैसे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सराईत गुन्हेगारांनी संदीप यांच्या प्रत्येक हालचालीवर तब्बल 2.5 वर्षांपासून बारीक लक्ष ठेवले होते. पीडित व्यक्ती GST चे कामकाज पाहत असल्याचे माहीत असल्याने आरोपींनी ही पूर्ण कहाणी रचली होती. ओलीस ठेवलेल्या स्थितीतच आरोपींनी संदीप यांच्याकडून त्यांच्या भावाला फोन करायला लावला आणि 29 लाख रुपये मागवून घेतले. भावाने रक्कम सुपूर्द केल्यानंतर आरोपी संदीप यांना सोडून फरार झाले.
मुख्य सूत्रधारासह 5 आरोपी गजाआड; सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत
घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी 5 विशेष पथके तयार करून परिसरातील 500 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी केली आणि मुख्य सूत्रधार कशिश चौहान (बिजनौर), राजेश पवार (दिल्ली), विवेक शर्मा (मथुरा), अंकित शाही (देवरिया) आणि अंशुल (एटा) या 5 जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 24.50 लाख रुपये रोख, 4.50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, सब-इन्स्पेक्टर व दिल्ली डिफेन्स फोर्सचा गणवेश आणि 7 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या धाडसी कारवाईमुळे पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.