मुंबई : उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून बँकांना गंडा घालतात, अशा बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. पण, सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाला त्यांच्याच एका निलंबित कर्मचाऱ्याने तब्बल 16.10 कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा आरोपी कर्मचारी हितेश सिंगला याला गुजरातमध्ये चालत्या ट्रेनमधून अटक करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्याने घोटाळा कसा केला?
आरोपी हितेश सिंगला (32) हा काही महिन्यांपासून कामावर येत नव्हता. अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये (Internal Audit) खात्यांमध्ये तफावत आढळल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. बँक ऑफ इंडियाने तातडीने केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) याची माहिती दिली आणि ऑगस्ट महिन्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगलाने मे 2023 ते जुलै 2025 या कालावधीत पद्धतशीरपणे हा घोटाळा केला. सिंगलाने ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन, मृत व्यक्ती आणि अनेक वर्षांपासून आपल्या खात्यावरील बॅलन्स तपासलेला नाही, अशा निष्क्रिय (Inactive) खातेधारकांना लक्ष्य केले.
फसवणुकीची पद्धत: त्याने मुदत ठेवी (Fixed Deposits), पीपीएफ (PPF), ज्येष्ठ नागरिक योजना आणि काही निष्क्रिय खात्यांचा निपटारा करण्यासाठी अंतर्गत बँकिंग प्रणालींमध्ये हेराफेरी केली.
पैसे वळवले: या निष्क्रिय खात्यांमधील रक्कम सिंगला याने स्वतःच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमध्ये वळवली. हस्तांतरण लहान हप्त्यांमध्ये विभागले गेले होते, ज्यामुळे फसवणूक लगेच उघड झाली नाही.
हेही वाचा – Delhi Bomb Threat: दिल्ली विमानतळ आणि शाळांना ई-मेलद्वारे बॉम्ब धमक्या; पोलीस सतर्क, चौकशी सुरू
घोटाळ्याचे 90% पैसे जुगार आणि क्रिप्टोमध्ये गमावले
बँकेतून लुटलेल्या पैशांचा वापर सिंगलाने ज्या पद्धतीने केला, त्याने तपासकर्त्यांनाही धक्का बसला. सिंगलाने या रकमेपैकी तब्बल 90 टक्के पैसे शेअर मार्केटच्या फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, क्रिप्टो टोकन्समध्ये आणि ऑनलाईन जुगारात उडवले.
आता गुन्ह्यातील रक्कम त्याच्याकडे शिल्लक उरलेली नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या गुन्ह्यातील रक्कम या आरोपीकडे शिल्लक नाही. कारण आरोपीने 90 टक्के रक्कम जुगारात गमावली आहे. तर उर्वरित काही रक्कम त्याने स्वतःवर खर्च केली.
सिंगलाने मुंबईतील एका मैत्रिणीजवळ तात्पुरते ठेवलेले 1.5 कोटी रुपये देखील सिंगलाने जुगारावर उधळले. अखेर हितेश सिंगलाला गुजरातमध्ये अटक करण्यात आली. त्याला गुजरातमधून चालत्या ट्रेनमधून अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा – Divorce Couple Survey: घटस्फोटामुळे कर्जबाजारी झाले 42 टक्के पुरुष! सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक आकडेवारी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.