Thieves Dialed 112: मार खाण्यापेक्षा तुरुंगात जाणं परवडलं.. चोरांनी केला पोलिसांना फोन! ‘आमचा जीव वाचवा..’

अंधार झाल्यामुळे आणि दुकानातून येणाऱ्या संशयास्पद आवाजांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना जाग आली आणि ते घराबाहेर पडले.
Thieves Dialed 112: मार खाण्यापेक्षा तुरुंगात जाणं परवडलं.. चोरांनी केला पोलिसांना फोन! ‘आमचा जीव वाचवा..’

BR Jewellers Umargam Gujarat Robbery: एका दागिन्यांच्या दुकानात घरफोडीचा एक अत्यंत अजब आणि नाट्यमय प्रकार घडला आहे. मुंबईच्या बोईसर आणि नालासोपारा परिसरात वास्तव्यास असणारे दिनेश सोनकर (वय 32) आणि विपिन पाठक (वय 27) हे दोन्ही आरोपी पहाटे सुमारे 3 वाजता बी. आर. ज्वेलर्स नावाच्या दुकानाचे शटरचे कुलूप कापून आत शिरले. चोरटे मौल्यवान दागिने आणि रोकड बॅगेत भरत असतानाच परिसरात अचानक वीजपुरवठा खंडित झाला. अंधार झाल्यामुळे आणि दुकानातून येणाऱ्या संशयास्पद आवाजांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना जाग आली आणि ते घराबाहेर पडले. गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील संजान शहरात हा प्रकार घडला.

स्थानिकांनी शटर पाडून चोरांना कोंडले; संतप्त जमाव पाहून आरोपी घाबरले
दुकानमालक मनीष शर्मा यांच्या घरासमोर राहणाऱ्या एका मित्राला हा सर्व प्रकार लक्षात आला आणि त्याने तात्काळ आरडाओरड करून शेजाऱ्यांना एकत्र केले. चोरी होत असल्याचे लक्षात येताच सतर्क नागरिकांनी कोणतीही रिस्क न घेता दुकानाचे शटर बाहेरून खाली ओढले आणि कुलूप बंद केले. पाहता पाहता दुकानाबाहेर स्थानिक रहिवाशांचा मोठा आणि संतप्त जमाव जमला. शटर बंद झाल्यामुळे आतच अडकलेले दोन्ही चोरटे बाहेरचा प्रचंड जनसमुदाय पाहून अत्यंत भीतीने हादरले आणि जमावाच्या तावडीत सापडल्यास जबर मारहाण होईल या भीतीने ते सुटकेचा मार्ग शोधू लागले.

हेही वाचा – Nashik Crime : 'प्रेमात फसवलं, माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले'; चिठ्ठी लिहित तरुणाने घेतला गळफास, प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप

पकडले जाण्याच्या भीतीपेक्षा मारहाणीची दहशत; चोरांनीच फिरवला 112 नंबर
अखेर मारहाणीच्या प्रचंड भीतीने दोन्ही चोरांनी थेट 112 या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर फोन लावून पोलिसांकडेच मदतीची याचना केली. आपण दागिन्यांच्या दुकानात अडकलो असून बाहेर लोकांनी वेढा घातला आहे, त्यामुळे तातडीने येऊन आमचे रक्षण करा, असे दिनेश सोनकरने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे याच वेळी स्थानिक नागरिकांनीही पोलिसांना चोरीबद्दल फोन केला होता. उमरगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेताच, पोलिसांची गाडी आल्याचे पाहून दोन्ही चोरांनी तात्काळ दुकानाचे शटर उघडले आणि हात वर करून आत्मसमर्पण केले.

दोन्ही आरोपींना अटक; भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल
उमरगाव पोलिसांनी दोन्ही आरोपी दिनेश सोनकर आणि विपिन पाठक यांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन अटक केली. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले हे दोन्ही आरोपी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत होते आणि त्यांनी ही चोरीची योजना आखली होती. या प्रकरणी दुकानमालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4), 305(a) आणि 54 अंतर्गत आरोपींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा – Beed: बीडमध्ये सीझरनंतर महिलेच्या पोटात हातमोजे अन् कागद? 19 वर्षीय नवमातेची प्रकृती गंभीर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version