Bhopal Minor Boy Murder for Organ Trafficking: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ 100 रुपयांचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. 6 ऑगस्ट रोजी इक्बाल मैदान परिसरातून हा मुलगा बेपत्ता झाला होता, ज्याचा कुजलेला मृतदेह चार दिवसांनंतर म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी छोटा तलाव क्षेत्रातील धोबीघाटजवळ आढळून आला. या गुन्ह्यामागे अवयव तस्करीचा एक भीषण कट दडलेला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
बनावट डॉक्टर अन् 2 कोटींच्या कमाईचे आमिष; अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात वापर
या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवत असे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने महिनाभरापूर्वी तीन अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. डॉक्टरसारखा पोशाख घालून भेटणाऱ्या या आरोपीने मोबाईलवर व्हिडिओ दाखवून 15 ते 16 वर्षे वयोगटातील मुलाचे अवयव विकल्यास तब्बल 2 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते, असे आमिष त्या अल्पवयीन मुलांना दिले होते. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींसह एकूण 5 जणांना ताब्यात घेतले आहे.
100 रुपयांचे आमिष देऊन अपहरण; अवयव काढल्याचा पोलिसांना संशय
आरोपींनी 17 वर्षीय पीडित मुलाला अवघ्या 100 रुपयांचे आमिष दाखवून इक्बाल मैदान परिसरातून सोबत नेले. हत्येनंतर आरोपींनी त्याच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव काढून घेतला असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे. हा अवयव आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत बाजारात विकण्यासाठी ग्राहकांचा शोध घेण्यात आला; मात्र वेळेत ग्राहक न मिळाल्यामुळे तो अवयव तलावाच्या पाण्यात फेकून देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
मोठे आंतरराष्ट्रीय अवयव तस्करी रॅकेट?
गुन्हा घडत असताना मुख्य आरोपी हा इतर अल्पवयीन सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात होता. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून हत्येचा मूळ हेतू, पैशांची देवाणघेवाण आणि या गुन्ह्यात आणखी कोणत्या मोठ्या टोळीचा हात आहे का, याचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणाचे धागेधोरे एखाद्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मानवी अवयव तस्करीच्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेले आहेत का, याचा शोध घेण्याचे काम भोपाळ पोलीस करत आहेत.
हेही वाचा – Amravati Crime: चॉकलेटचं आमिष दाखवत घरात नेलं अन् चिमुकलीसोबत नको ते कृत्य…; अमरावतीत धक्कादायक घटना
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.