बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पतीने पत्नीचा नैसर्गिक मृत्यू म्हणजेच हार्ट अटॅक झाल्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राजक्ता मेहेर (वय अंदाजे 30-35) असे मृत महिलेचे नाव असून तिचा विवाह 2010 साली बदलापूरच्या एरंजाड गावातील योगेश मेहेर याच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला 15 आणि 11 वर्षांची दोन मुले आहेत. सुरुवातीला कौटुंबिक जीवन सामान्य होते, मात्र काही वर्षांपासून पतीचे गावातीलच एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. या संबंधांमुळे घरातील वाद वाढत गेले आणि प्रकरण गंभीर स्वरूप धारण करू लागले.
तपासानुसार, योगेश मेहेर पत्नी प्राजक्तावर घटस्फोटासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र प्राजक्ताने घटस्फोट देण्यास स्पष्ट नकार दिल्याने वाद अधिक तीव्र झाले. 14 मार्च 2026 रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून “तुम्ही मुलीला घेऊन जा आणि हवे तेवढे पैसे घ्या” अशी ऑफर दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केला आहे. या घटनेनंतर कुटुंबातील तणाव आणखी वाढला.
8 एप्रिल रोजी पती-पत्नीमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. त्यानंतर 9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण हार्ट अटॅक नसून नाक-तोंड दाबून गुदमरून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पती योगेश मेहेर आणि त्याची आई यांना अटक केली. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात प्रेमसंबंध आणि घटस्फोटाचा दबाव हेच हत्येचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.