Alcohol Regulations: जगभरातील दारूविषयक कायदे अनेकदा आश्चर्यचकित करणारे असतात. काही देशांत मद्यपानावर संपूर्ण बंदी आहे, तर काही ठिकाणी नियम अतिशय मोकळे आहेत. अशातच आता सौदी अरेबिया या मुस्लिम देशाने दारूविषयक नियमांमध्ये केलेले बदल जगभर चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेष म्हणजे, येथे आता दारू खरेदी करण्यासाठी पगाराची स्लिप दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत सौदी अरेबियामध्ये दारूची विक्री आणि सेवन पूर्णपणे निषिद्ध होते. मात्र नव्या नियमांनुसार, गैर-मुस्लिम परदेशी नागरिकांना ठरावीक अटींवर दारू खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित व्यक्तीचे मासिक उत्पन्न किमान 50 हजार रियाल (सुमारे 11 लाख रुपये) असणे आवश्यक आहे. म्हणजेच, या नव्या नियमामुळे दारू केवळ उच्च उत्पन्न गटातील लोकांपुरती मर्यादित राहणार आहे.
याशिवाय, दारू खरेदीसाठी ‘प्रीमियम रेसिडेन्सी’ (सौदी ग्रीन कार्ड) असणेही आवश्यक ठरणार आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत परदेशी नागरिकांना सौदी अरेबियात दीर्घकाळ राहणे, काम करणे आणि मालमत्ता खरेदी करण्याची मुभा मिळते. यापूर्वी रियाधमध्ये फक्त परदेशी राजदूतांसाठीच एक दारू विक्री केंद्र उपलब्ध होते, मात्र आता ही सुविधा मर्यादित गटासाठी खुली करण्यात आली आहे.
ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 21 वर्षांपेक्षा अधिक असणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, वैद्यकीय तपासणी उत्तीर्ण होणे आणि पुरेशी आर्थिक क्षमता असणे आवश्यक आहे. दरम्यान, या नव्या नियमांवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हा कायदा 'श्रीमंतांसाठी सवलत, गरिबांसाठी निर्बंध' असल्याची टीका केली आहे. काहींनी तर दारू खरेदीसाठी उत्पन्नाचा पुरावा मागणे ही विचित्र आणि भेदभावपूर्ण बाब असल्याचे म्हटले आहे. या नियमांमुळे सौदी अरेबियातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.