Crime News : प्रेमविवाहात धोका! लग्नानंतर मारहाण, गर्भपात, अतोनात छळ, देहव्यवसायाची जबरदस्ती; पीडितेची न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव

Crime News : प्रेमविवाहात धोका! लग्नानंतर मारहाण, गर्भपात, अतोनात छळ, देहव्यवसायाची जबरदस्ती; पीडितेची न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पतीनेच पत्नीला जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. एवढंच नाही, विरोध केल्यावर मारहाण, दोन वेळा गर्भपात, सासरच्यांचा छळ आणि स्थानिक पोलिसांनीही गंभीर आरोपांची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा दावा महिलेने केला आहे. न्यायाच्या शोधात अखेर पीडितेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची पायरी चढावी लागली.

नागपूरमध्ये खासगी दुकानात काम करणाऱ्या या महिलेची ओळख लाखनी तालुक्यातील लखन भुरले याच्याशी झाली. ओळखीचे प्रेमात आणि प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले. सुखी संसाराची स्वप्नं पाहणारी ही महिला चार वर्षांपूर्वी लाखनीत आली. पण तिच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांतच संसाराचं रूप नरकात बदललं. महिलेच्या तक्रारीनुसार, पतीने काम करणं सोडलं आणि पत्नीवर देहव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. लाखनी परिसरातील ढाबे आणि इतर ठिकाणी ग्राहक आणून तिच्याकडून जबरदस्तीने देहव्यवसाय करून घेतल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकाराला विरोध केल्यावर तिला बेदम मारहाण करण्यात आली. या अत्याचारांमुळे दोन वेळा गर्भपात झाल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. सासू आणि दिरानेही वारंवार मारहाण केल्याचं तिचं म्हणणं आहे.

हेही वाचा : Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापजनक घटना! 4 वर्षीय चिमुरडीवर मानसिक विकृत तरुणाकडून अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त जमावाने…

पीडित महिला न्यायासाठी लाखनी पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, पतीविरोधातील देहव्यवसाय आणि अत्याचाराच्या आरोपांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही, असा दावा तिने केला आहे. उलट पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच सासू आणि दिराने पुन्हा मारहाण केल्याचाही आरोप आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर केवळ मारहाणीची तक्रार नोंदविण्यात आली. मात्र, पतीविरोधातील गंभीर आरोपांचा समावेश करण्यात आला नसल्याचा दावा पीडितेने केला आहे. पोलिसांनी "पतीसोबतच राहा" असा सल्ला दिल्याचाही आरोप तिने केला आहे. स्थानिक स्तरावर न्याय मिळत नसल्याची भावना झाल्यानंतर पीडित महिलेने थेट भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिने केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version