Sanjay Raut Threat : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भांडुप येथील त्यांच्या 'मैत्री' निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेवर "आज रात्री १२ वाजता बॉम्ब ब्लास्ट होईल," असा मजकूर लिहिलेला आढळल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
नेमकं काय घडलं?
संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर गेल्या अनेक दिवसांपासून एक कार धूळ खात उभी आहे. आज सकाळी या गाडीच्या मागील काचेवर बोटाने लिहिलेला एक भीतीदायक संदेश कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडला. हिंदीत लिहिलेल्या या संदेशात म्हटले होते की, "आज हंगामा होगा! आज रात 12:00 AM बॉम्ब ब्लास्ट होगा". इतकेच नव्हे तर दुसऱ्या बाजूला "CST में बॉम्ब ब्लास्ट होगा" असे लिहून खाली एक 'स्माईल' काढण्यात आली होती.
सुरक्षेत वाढ आणि पोलिसांचा तपास
धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) श्वानपथकासह राऊतांच्या घरी पोहोचले. संपूर्ण परिसराची कसून झडती घेण्यात आली असून ज्या कारवर हा मजकूर लिहिला होता, ती कोणाची आहे? याचा शोध घेतला जात आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून यामागे खोडसाळपणा आहे की काही मोठे षडयंत्र, याचा तपास करत आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युती घडवून आणण्यात राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या राजकीय घडामोडींमुळे राऊत केंद्रस्थानी असतानाच ही धमकी आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तथापी, महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे अनेक इच्छुक नाराज आहेत. या रागातून एखाद्या कार्यकर्त्याने हे कृत्य केले का? या अंगानेही पोलीस तपास करत आहेत.
यापूर्वीही राऊतांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी 'रेकी' केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या ताज्या धमकीकडे गृह विभागाने अत्यंत गांभीर्याने पाहिले असून राऊतांच्या सुरक्षेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. संजय राऊत दररोज सकाळी आपल्या आक्रमक शैलीत पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागत असतात. अशातच थेट घराबाहेर बॉम्बची धमकी मिळाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.