India US Tariff: टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न! भारतासाठी आयात शुल्क कमी करण्यामागची ‘ही’ पाच मोठी कारणं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेतला.
India US Tariff: टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न! भारतासाठी आयात शुल्क कमी करण्यामागची ‘ही’ पाच मोठी कारणं

India US Tariff: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांमध्ये महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला २५ टक्के ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ अचानक १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी चर्चेनंतर हा निर्णय जाहीर झाल्याने जागतिक व्यापार क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय अचानक वाटत असला, तरी त्यामागे काही ठोस राजकीय आणि आर्थिक कारणं असल्याचं स्पष्ट होतं.

हा टॅरिफ यू-टर्न नेमका का घेण्यात आला, यामागची प्रमुख पाच कारणं पुढीलप्रमाणे: 

1. अमेरिकेतील महागाईचा दबाव
ट्रम्प यांनी यापूर्वी विविध देशांवर लादलेल्या उच्च टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई कमी होण्याऐवजी वाढल्याचं दिसून आलं. विशेषतः भारतीय वस्तूंवर जास्त टॅरिफ लागल्याने त्या अमेरिकन बाजारात महाग झाल्या. कपडे, औषधं, अन्नधान्य आणि दैनंदिन वापरातील अनेक भारतीय उत्पादने आता अमेरिकन जीवनशैलीचा भाग बनली आहेत. त्यामुळे सामान्य अमेरिकी नागरिकांकडून ट्रम्प प्रशासनावर टॅरिफ कमी करण्याचा दबाव वाढत गेला.

2. युरोप-भारत जवळीक आणि अमेरिकेची भीती
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या ट्रेड डीलमुळे अमेरिका काहीशी अस्वस्थ झाली आहे. युरोपसोबतचे अमेरिकेचे संबंध काही मुद्द्यांवर ताणले गेले असताना, भारत-ईयू करारामुळे अमेरिका जागतिक व्यापारात एकटी पडत असल्याची भावना निर्माण झाली. भारत जर युरोपकडे अधिक झुकला, तर अमेरिकेचा प्रभाव कमी होऊ शकतो, ही बाब ट्रम्प यांच्या लक्षात आली.

3. चीनला पर्याय म्हणून भारताची गरज
अमेरिका-चीन ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर चीनवरील अवलंबित्व कमी करणं, हे अमेरिकेचं दीर्घकालीन धोरण आहे. चिनी निर्यातीने ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्याने अमेरिका अधिक सावध झाली आहे. अशा परिस्थितीत जागतिक पुरवठा साखळीत चीनला पर्याय म्हणून भारतच सक्षम देश असल्याचं अमेरिकेला जाणवत आहे. त्यामुळे भारताला प्रोत्साहन देण्यासाठी टॅरिफ कमी करणं आवश्यक ठरलं.

4. तेल राजकारण आणि वेनेजुएलाचा पर्याय
भारत मोठ्या प्रमाणावर रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करतो. मात्र, रशियाच्या तेलातून मिळणारा पैसा युद्धासाठी वापरला जातो, असा अमेरिकेचा दावा आहे. त्यामुळे भारताने रशियन तेलाऐवजी वेनेजुएलाचं तेल घ्यावं, यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. या व्यवहारात भारत सहकार्य करावा, यासाठी टॅरिफ सवलत हा दबावाचा आणि आकर्षणाचा मार्ग ठरतो.

5. भारताची वाढती जागतिक ताकद
भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, वेगाने वाढणारी आर्थिक शक्ती आहे. भारत-रशिया, भारत-कॅनडा, तसेच दक्षिण अमेरिकन देशांशी सुरू असलेल्या चर्चा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. भारत जर स्वतंत्रपणे अनेक देशांशी मजबूत व्यापार संबंध प्रस्थापित करत राहिला, तर अमेरिकेचं महत्त्व कमी होऊ शकतं. त्यामुळे भारताला जवळ ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने टॅरिफमध्ये मवाळ भूमिका घेतली.

ट्रम्प यांचा टॅरिफवरील यू-टर्न हा केवळ एका फोन कॉलचा परिणाम नसून, जागतिक राजकारण, व्यापार युद्ध, तेल धोरण आणि भारताची वाढती ताकद यांचा एकत्रित परिणाम आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका ट्रेड डीलचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचं चित्र दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version