Iran US War: 21 तासांचा मॅरेथॉन संवाद, पण तोडगा काहीच नाही; अमेरिका-इराण शांतता चर्चा फिस्कटली

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात 21 तास चाललेली शांतता चर्चा निष्फळ ठरली असून, अणु कार्यक्रमावर मतभेद कायम राहिले.
Iran US War: 21 तासांचा मॅरेथॉन संवाद, पण तोडगा काहीच नाही; अमेरिका-इराण शांतता चर्चा फिस्कटली

वॉशिंग्टन: जागतिक शांततेच्या क्षितिजावर दोन आठवड्यांपूर्वी उमटलेली शस्त्रसंधीची रेघ आता धूसर होताना दिसत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील अत्यंत कळीच्या शांतता चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, दुर्दैवाने कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. 21 तासांच्या प्रदीर्घ आणि मॅरेथॉन चर्चेनंतरही दोन्ही देश एका निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत, ज्यामुळे आखाती प्रदेशासह संपूर्ण जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. 'विनाशकाले विपरीत बुद्धी' या उक्तीप्रमाणे इराण त्यांच्या अवास्तव मागण्यांवर ठाम राहिल्याने ही संधी हुकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी या चर्चेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली. "आम्ही अत्यंत चांगल्या हेतूने आणि शांततेचा प्रामाणिक प्रस्ताव घेऊन इस्लामाबादला आलो होतो. मात्र, इराण अमेरिकेच्या मूलभूत अटी स्वीकारण्यास तयार नाही," असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेच्या शिष्टमंडळाने त्यांचा 'सर्वोत्तम आणि अंतिम' प्रस्ताव इराणसमोर ठेवला होता, परंतु अनेक संवेदनशील मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचे एकमत होऊ शकले नाही. विशेषतः इराणने अण्वस्त्रे बाळगू नयेत, ही अमेरिकेची प्रमुख अट मान्य करण्यास इराणने नकार दिल्याने ही चर्चेची गाडी रुळावरून घसरली.

हेही वाचा: CSK Vs DC IPL 2026: विजयाचा दुष्काळ अखेर संपला! ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जची दिल्लीवर 23 धावांनी मात; गुणतालिकेत घेतली मोठी झेप

या उच्चस्तरीय बैठकीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्यासह राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी केले. तर इराणच्या वतीने परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी आपली बाजू मांडली. या ऐतिहासिक चर्चेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, 21 तासांच्या या वैचारिक युद्धात राजनैतिक शिष्टाई अपयशी ठरली असून, अमेरिकन शिष्टमंडळ आता रिकाम्या हाती मायदेशी परतत आहे.

चर्चेतील सर्वात मोठा अडथळा ठरला तो म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, इराणला अण्वस्त्रे मिळवणे जागतिक सुरक्षेसाठी घातक ठरेल. इराण मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने वाटाघाटींची ही प्रक्रिया अनिर्णित राहिली. "आम्ही कराराशिवाय परतत आहोत. इराणसोबतची कोंडी फोडण्यात आम्हाला यश आलेले नाही," असे व्हान्स यांनी हताशपणे सांगितले. या अपयशी चर्चेमुळे आता भविष्यात संघर्षाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता या संपूर्ण प्रकरणाची सूत्रे पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये पोहचली आहेत. उपराष्ट्रपती व्हान्स यांनी स्पष्ट केले आहे की, यापुढील दिशा आता खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरवतील. ट्रम्प या प्रकरणाचा शेवट कसा करतात आणि आखातात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणते कठोर पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. सध्या तरी इस्लामाबादमधील या 'मॅरेथॉन' चर्चेने जागतिक राजकारणात शांततेऐवजी अस्थिरतेचेच संकेत दिले आहेत. 

हेही वाचा: Kunal Kamra: 'माफी मागितली तर ते…', 'देशद्रोही' शब्दावरून निर्माण झालेल्या वादाला कुणाल कामरांचे प्रसाद लाड यांना रोखठोक उत्तर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version