Benjamin Netanyahu Prostate Cancer Surgery : इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या भीषण तणाव सुरू असतानाच पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक पण दिलासादायक खुलासा केला आहे. नेतान्याहू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला कर्करोग झाल्याची माहिती दिली. नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, 2024 मध्ये एका वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यांना या आजाराचे निदान झाले होते. मात्र, एका बाजूला शत्रू राष्ट्रांशी युद्ध लढत असताना त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने या आजारावर उपचार घेतले आणि आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. नेतान्याहूंबद्दल विशेष बाब म्हणजे ते गेल्या 19 वर्षांपासून इस्रायलचे नेतृत्व करत आहेत.
यशस्वी शस्त्रक्रिया आणि गोपनीयता
इस्रालयच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, नेतान्याहू यांना प्रोस्टेटचा कर्करोग (Prostate Cancer) झाला होता. जेरुसेलम येथील हदासा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातील 1 सेंटीमीटरचा एक छोटा ट्युमर यशस्वीपणे बाहेर काढला आहे. या प्रकरणाची गोपनीयता राखण्याबाबत बोलताना नेतान्याहू म्हणाले की, जर ही माहिती आधी उघड झाली असती, तर इराणसारखे शत्रू राष्ट्र याद्वारे 'फेक न्यूज' पसरवून इस्रायलमध्ये अस्थिरता निर्माण करू शकले असते. डिसेंबर 2024 मध्ये झालेली त्यांची प्रोस्टेट शस्त्रक्रिया याच आजाराशी संबंधित होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधानांचा लढाऊ बाणा
"मी केवळ शत्रूंनाच नाही, तर कर्करोगालाही हरवले आहे," अशा शब्दांत नेतान्याहू यांनी आपला आनंद व्यक्त केला. दीड वर्षांपूर्वी या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसल्यापासून त्यांनी त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचे काही वैद्यकीय रिपोर्ट येणे बाकी होते, जे आता प्राप्त झाले असून त्यात ते पूर्णपणे कर्करोगमुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. संकटाच्या काळात खचून न जाता त्यावर तातडीन उपाय शोधणे आणि संकटावर मात करणे ही आपली पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या ते पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने देशाचे कामकाज पाहण्यास सज्ज झाले आहेत.
राजकीय कारकीर्द आणि ध्येय
बेंजामिन नेतान्याहू हे इस्रायलच्या इतिहासातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. 1996 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यानंतर 2009 ते 2021 आणि आता 2022 पासून ते सलग सत्तेत आहेत. त्यांच्या कार्यकाळात इस्रायलने हमास आणि हेजबोल्लाह सारख्या कट्टरवादी संघटनांना कमकुवत करण्यात मोठे यश मिळवले आहे. मध्य पूर्वेत 'ग्रेटर इस्रायल' बनवण्याचे त्यांचे स्वप्न असून, या आजारातून सावरल्यानंतर ते आपल्या मोहिमेवर अधिक जोमाने लक्ष केंद्रित करतील, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा – Iran US Talk: अमेरिका-इराणमध्ये दुसऱ्यांदा होणार चर्चा, समोरासमोर नाही तर 'या' माध्यमातून साधणार संवाद
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.