Iran Destroys 12 US Military Bases in Gulf Countries : इराणची विविध पातळ्यांवरील वाढती ताकद आणि तेथील खनिजसंपत्ती अमेरिकेला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होती. तसेच, इराणचा मध्यपूर्वेतील वाढता प्रभावही धोकादायक होता. अखेर इस्रायल-अमेरिकेने इराणविरुद्ध आघाडी उघडलीच.. परंतु, इराणची ताकद या दोघांच्या समजुतीपेक्षा खूप जास्त असल्याचं समोर आलं. शिवाय, इराणचं जगाच्या भूराजकीय नकाशावरील स्थान आणि ताब्यात असलेली होर्मूजची सामुद्रधुनी संपूर्ण जगासाठी अवघड जागचं दुखणं बनलं. याचाच वापर करून इराणने असे काही पलटवार केले की, अमेरिकेचा चेहरा चांगलाच पोळून निघाला आणि मोठं आर्थिक आणि राजकीय नुकसान सोसावं लागलं. इतकं करून 40 दिवसांच्या युद्धानंतरही इराणच्या 10 अटींशिवाय काहीही हाती लागलं नाही. यामुळे अमेरिकेच्या मोठेपणाची हवा निघाली आणि अमेरिकेचं जगात अक्षरशः नाक कापलं गेलं. इराणला स्वतःसमोर दुबळं समजणं अमेरिकेची मोठी चूक ठरली. आता अमेरिकन सरकारला स्वतःच्याच देशात तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही.
मध्य पूर्वेतील सत्तासंघर्षात अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला असून पश्चिम आशियातील शक्ती संतुलन पूर्णपणे बदलले आहे. जे लष्करी तळ एकेकाळी अमेरिकेची ताकद मानले जायचे, तेच आता त्यांची सर्वात मोठी कमजोरी बनले आहेत. इराणने केलेल्या भीषण प्रत्युत्तराच्या कारवाईत सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि बहरीनमधील अमेरिकन तळांचे अतोनात नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, आखाती देशांतील अमेरिकेचे 12 सैन्य तळ इतक्या वाईट रीतीने उद्ध्वस्त झाले आहेत की, त्यांचा पुन्हा वापर करणे आता अशक्य बनले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे हे एअरबेस आता केवळ ढिगारा बनले असून ते वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत.
नौदलाच्या शक्तिशाली मुख्यालयावर प्रहार
बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीटचे मुख्यालय हे अमेरिकेच्या समुद्री शक्तीचे प्रमुख केंद्र मानले जायचे. मात्र, इराणने थेट या मुख्यालयालाच लक्ष्य करून अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. 1990 च्या दशकातील आखाती युद्धापासून अमेरिकेने या प्रदेशात आपले जाळे मजबूत केले होते. या संपूर्ण क्षेत्रात अमेरिकेचे सुमारे 19 मोठे सैन्य तळ असून तिथे साधारण 50000 सैनिक तैनात असतात. या बदल्यात आखाती देशांना संरक्षण आणि अमेरिकेला तेल असा करार होता. मात्र, आता हे समीकरण पूर्णपणे कोलमडताना दिसत आहे.
माहिती लपवण्याचा आखाती देशांचा प्रयत्न
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांच्या मते, इराणने अवघ्या एका महिन्यात अमेरिकेची दशकानुदशकाची शक्ती संपवून टाकली आहे. विशेष म्हणजे, झालेल्या नुकसानीचे खरे फोटो आणि व्हिडिओ अजूनही जगासमोर येऊ दिले जात नाहीत. युद्ध काळात सौदी अरेबिया, यूएई आणि कुवेतसारख्या देशांनी आपल्या आकाशात क्षेपणास्त्रांचे फोटो काढण्यावर किंवा रेकॉर्डिंग करण्यावर कडक बंदी घातली होती. आपल्या देशातील लष्करी तळांची झालेली दुरवस्था जगापासून लपवण्यासाठी हे देश धडपडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड दबाव
या भीषण युद्धामुळे आखाती देशांच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर अभूतपूर्व दबाव निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, अनेक देशांना आपली आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शाळा अनिश्चित काळासाठी बंद कराव्या लागल्या. जेव्हा एखाद्या संरक्षण करारात एका पक्षाला फायद्याऐवजी प्रचंड नुकसान सोसावे लागते, तेव्हा ते नाते कमकुवत होते. अमेरिकेसोबत राहिल्यामुळे आपल्याच देशातील पायाभूत सुविधांचे नुकसान होत असल्याचे पाहून आता आखाती देशांचा अमेरिकेवरील विश्वास उडू लागला आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनापुढील पेच
इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या 2 आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर झाला असला, तरी झालेल्या नुकसानीची भरपाई करणे ट्रम्प प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. ट्रम्प यांनी अद्याप आपल्या लष्करी तळांच्या नुकसानीची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, आखातातील अमेरिकेची पकड सैल होत असून इराणने या प्रदेशात आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. हा केवळ दोन देशांमधील संघर्ष नसून जागतिक भू-राजकारणातील एका मोठ्या बदलाची नांदी मानली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.