दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर भारतासह जगभरात शोक व्यक्त केला जात असताना, शेजारी देश पाकिस्तान मध्ये त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी त्यांच्या निधनाची व्यापक दखल घेतली, मात्र त्यावेळी त्यांच्या गाण्यांचे प्रसारण केल्यामुळे वादाला तोंड फुटले.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी यांनी जिओ न्यूज या वाहिनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये आशा भोसले यांच्या निधनाच्या बातमीदरम्यान भारतीय गाणी आणि चित्रपटांचे दृश्य प्रसारित का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये 2018 पासून भारतीय संगीत सामग्रीवर बंदी लागू आहे. अशा परिस्थितीत श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान भारतीय गाण्यांचे प्रसारण करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे पेमराचे म्हणणे आहे. आदेशामध्ये विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचा उल्लेख करत, जिओ न्यूजचे मालक ‘इंडिपेंडंट मीडिया कॉर्पोरेशन’च्या अधिकाऱ्यांना 27 एप्रिल 2026 पूर्वी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, जिओ न्यूजकडून 14 दिवसांत लेखी स्पष्टीकरणही मागवण्यात आले आहे. योग्य समाधानकारक उत्तर न दिल्यास दंड, निलंबन किंवा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते, अशी चेतावणीही पेमराने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पाकिस्तानातील माध्यम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी या कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, एखाद्या दिग्गज कलाकाराबद्दल बातमी देताना त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही परंपरा आहे. आशा भोसले यांच्यासारख्या महान कलाकारांच्या गाण्यांशिवाय श्रद्धांजली अपूर्ण राहते, असे त्यांनी नमूद केले.
अझहर अब्बास यांनी पुढे म्हटले की, कला ही संपूर्ण मानवजातीची समान संपत्ती आहे आणि तिला सीमा किंवा राजकारणाच्या चौकटीत अडकवू नये. आशा भोसले यांनी पाकिस्तानातील प्रसिद्ध गायिका नूरजहाँ यांचा नेहमीच सन्मान केला आणि त्यांना ‘मोठी बहीण’ म्हणत असत. तसेच त्यांनी नुसरत फतेह अली खान यांच्यासोबतही काम केले होते.
या पार्श्वभूमीवर, युद्ध किंवा तणावाच्या काळात कला आणि कलाकारांना लक्ष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संगीत आणि साहित्य हे लोकांना जोडणारे माध्यम आहे आणि ते विभाजनाऐवजी ऐक्य निर्माण करण्याचे काम करते, असा संदेश त्यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.