अहमदाबाद: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सूस्साट सुटली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या स्पर्धेतील 36 व्या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर विजय मिळवत विजयी घोडदौड कायम राखली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ‘मेन इन ब्लू’ने नेदरलँड्सच्या डच संघाला पराभवाची धूळ चारत, साखळी फेरीतील भारतीय क्रिकेट संघाचा सलग चौथा विजय नोंदवला. या दिमाखदार विजयासह भारतीय संघाने ‘अ’ गटामध्ये अव्वल स्थान (नंबर एक) पटकावत भारतच या स्पर्धेचे प्रबळ दावेदार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सामन्याचे पारडे फिरवण्याची किमया अष्टपैलू शिवम दुबे याने करून दाखवली. शिवम दुबे या सामन्याचा खऱ्या अर्थाने ‘विजयाचा शिल्पकार’ ठरला. कर्णधार सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र मधल्या फळीत धावसंख्येला गती देण्याचे काम शिवमने चोख बजावले. त्याने हार्दिक पंड्यासोबत पाचव्या विकेटसाठी अवघ्या 35 चेंडूत 76 धावांची अभेद्य भागीदारी रचली. शिवमने आक्रमक शैलीत 31 चेंडूंत सहा गगनभेदी षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी साकारली. त्याला हार्दिक (30), सूर्यकुमार (34) आणि तिलक वर्मा (31) यांची सुरेख साथ लाभली, ज्यामुळे भारताला नेदरलँड्ससमोर 194 धावांचे तगडे आव्हान उभे करता आले.
नेदरलँड्सच्या संघाने 194 धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना हार मानली नाही. त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत निकराची झुंज दिली, पण अनुभवाच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली. नेदरलँड्सच्या फलंदाजांनी भारतीय माऱ्याचा सामना करत दुहेरी धावसंख्या गाठली, परंतु एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही, हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. बास दी लिडे (33), मायकल लेविट (24) आणि मॅक्स ओडॉड (20) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजीच्या शिस्तीपुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. नेदरलँड्सला 20 षटकांत सात गडी गमावून 176 धावांवरच मजल मारता आली.
भारतीय गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्तीची फिरकी पुन्हा एकदा जादुई ठरली. त्याने नेदरलँड्सच्या धावगतीला लगाम घालत तीन महत्त्वाचे बळी टिपले. तर बॅटिंगमध्ये धमाल करणाऱ्या शिवम दुबेने गोलंदाजीतही कमाल करत दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एका विकेटची कमाई करत नेदरलँड्सला विजयापासून दूर ठेवले. नेदरलँड्सकडून लोगन वॅन बीक आणि आर्यन दत्त यांनी गोलंदाजीत चमक दाखवली असली तरी, भारताच्या अष्टपैलू कामगिरीपुढे नेदरलँड्सला विश्वचषक मोहीम विजयाने संपवण्यात अपयश आले.
? ? ? ?#TeamIndia end the league stage with a 4⃣th consecutive victory ✅ Bring on the Super 8s ? Scorecard ▶️ https://t.co/SdXngdnwKB#T20WorldCup | #MenInBlue | #INDvNED️ pic.twitter.com/pgi086F3ls — BCCI (@BCCI) February 18, 2026
शिवम दुबेच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह टीम इंडियाने साखळी फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. घरच्या मैदानावर आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात भारताने मिळवलेला हा विजय सुपर-8 फेरीसाठी संघाचा आत्मविश्वास दुप्पट करणारा ठरला आहे. आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष स्पर्धेच्या पुढील टप्प्याकडे लागले असून, सूर्यकुमारची ही ‘यंग ब्रिगेड’ असाच धडाका कायम ठेवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.