Margshirsh Guruwar 2025 : मार्गशीर्षातला पहिला गुरुवार कधी? 20 की 27 नोव्हेंबरला? जाणून घ्या, कलशाची स्थापना कधी आणि कशी करावी

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना (Margshirsh 2025) अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची संधी सर्वांना मिळते.
Margshirsh Guruwar 2025 : मार्गशीर्षातला पहिला गुरुवार कधी? 20 की 27 नोव्हेंबरला? जाणून घ्या, कलशाची स्थापना कधी आणि कशी करावी

Margshirsh Guruwar 2025 : यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यातही (Margshirsh 2025) दरवर्षीप्रमाणेच गुरुवारी देवी लक्ष्मीचे (Goddess Lakshmi) व्रत केले जाणार आहे आणि पूजेसाठी कलश मांडला जाणार आहे. मात्र, मार्गशीर्ष महिना 20 नोव्हेंबर च्या गुरुवारी सुरू होत असला, तरी या दिवशी व्रत करायचे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना (Margshirsh 2025) अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. अनेक व्रत-वैकल्य, सण आणि शुभ कार्य या महिन्यात साजरे केले जातात. आता आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे महत्त्व आणि नेमक्या तारखा जाणून घेऊया.

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कधी?
पंचांगानुसार, आज, 19 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक अमावस्या आहे. ही अमावस्या उद्या गुरुवार, 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी समाप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे, मार्गशीर्ष महिना शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025 पासून मानला जाईल. अमावस्या तिथी गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी असल्याने, 20 नोव्हेंबर हा दिवस अमावस्या म्हणून पाळला जाईल. त्यामुळे अमावस्या संपल्यानंतरही 20 तारखेचा गुरुवार मार्गशीर्षात धरला जाणार नाही.

यंदा मार्गशीर्ष गुरुवार व्रत कधीपासून आणि किती गुरुवारी करायचे?
20 नोव्हेंबर रोजी गुरुवार असला तरी, तो मार्गशीर्ष महिन्याचा नव्हे, तर अमावस्येचा दिवस आहे. त्यामुळे, या दिवशी कलश मांडला जाणार नाही. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू होते. त्यामुळे, पहिले मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे पुढील आठवड्यात, म्हणजेच गुरुवारी, 27 नोव्हेंबर 2025 रोजी असेल. 21 डिसेंबर 2025 पर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे.

हेही वाचा – Kartik Amavasya 2025 : 'या' 5 राशींसाठी असेल अत्यंत कठीण काळ; वाढू शकतात अडचणी

मार्गशीर्ष महिन्यात किती गुरूवार?
पहिला गुरूवार: 27 नोव्हेंबर
दुसरा गुरूवार: 04 डिसेंबर
तिसरा गुरूवार: 11 डिसेंबर
चौथा गुरूवार: 18 डिसेंबर 
या चार गुरुवारी 'मार्गशीर्ष गुरुवार'चे व्रत करावे.

मार्गशीर्षातला कलश कसा मांडाल?
– कलश ज्या ठिकाणी मांडाल, तिथली जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावा. 
– त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. 
– चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. 
– कलशाला हळद-कुंकू लावावे. आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवावी.
– लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवावा.
– विड्याची पाने किंवा आंब्याच्या 5, 7, 9 किंवा 11 पानांचा टहाळा गोलाकारात कलशावर (देठं कलशात घालून) ठेवावा. पंचपात्र कलशावर उपडे ठेवावे. त्यावर नारळ ठेवावा. (नारळाला शेंडी असावी आणि ती वरच्या दिशेला करावी.) अशा प्रकारे कलशाची स्थापना करावी. 
– आता त्या ठिकाणी कलशाला टेकवून श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र आपल्याकडे तोंड करून ठेवावे किंवा शक्य नसल्यास वरची बाजू कलशाकडे आणि पायाकडील बाजू आपल्याकडे ठेवून जमिनीवर आडवे ठेवावे.
– कलशापुढे विड्याची दोन पाने, पानांवर सुपारी (गणपती म्हणून) ठेवावी. त्याला हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहावेत. धूप-दीप ओवाळावेत.
– खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ नैवेद्य म्हणून ठेवावा. याव्यतिरिक्त तुम्ही यथाशक्ती नैवेद्य अर्पण करू शकता.

हेही वाचा – Kartik Amavasya 2025 : उद्या कार्तिक अमावस्या! धन-समृद्धीसाठी 'हे' प्रभावी उपाय नक्की करा

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आणि ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही किंवा दावा करत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version