Lionel Messi: फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच, कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये चाहत्यांचा संताप पाहायला मिळाला. मैदानावर मेस्सीने अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळ उपस्थिती दर्शवल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आणि त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तीन दिवसांच्या GOAT इंडिया टूरसाठी लिओनेल मेस्सी 13 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता कोलकात्यात दाखल झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी हजारो चाहते जमले होते. “मेस्सी, मेस्सी!”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विमानतळावरून तो थेट हॉटेलमध्ये रवाना झाला आणि त्यानंतर विविध कार्यक्रमांसाठी त्याचे नियोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल हेही मेस्सीसोबत उपस्थित होते.
कोलकात्यातील लेक सिटी भागात मेस्सीच्या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर त्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तसेच आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष संजीव गोयंका यांची भेट घेतली. पुढे मेस्सी साल्ट लेक स्टेडियममध्ये पोहोचला, जिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते आधीपासूनच उपस्थित होते. दरम्यान, मेस्सी मैदानावर येताच त्याने प्रेक्षकांना हात हलवून अभिवादन केले. मात्र काही क्षणांतच तो मैदान सोडून निघू लागल्याचे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. अपेक्षेप्रमाणे त्याने कोणताही फुटबॉल खेळ न करता अवघ्या काही मिनिटांतच मैदान सोडल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली.
हेही वाचा – Cricket Match Fixing: क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगप्रकरणी चार खेळाडूंविरोधात FIR, नेमकं प्रकरण काय?
मैदानात चाहत्यांचा गोंधळ
या घटनेनंतर स्टेडियममध्ये गोंधळ उडाला. संतप्त चाहत्यांनी मैदानाच्या दिशेने धाव घेतली. काहींनी खुर्च्या फेकल्या तर काहींनी पाण्याच्या बाटल्या मैदानात फेकल्या. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘मेस्सी फक्त 10 मिनिटांसाठी आला. त्याच्याभोवती फक्त राजकारणी आणि मोठ्या व्यक्ती होत्या. सामान्य चाहत्यांना काहीच दिसले नाही. ना त्याने किक मारली, ना पेनल्टी. आम्ही खूप निराश झालो.’
हेही वाचा – IND vs SA 3rd T20 : गिलचा पत्ता कट? पराभवानंतर टीम इंडिया ‘या’ खेळाडूला देणार ओपनिंगची संधी
तथापी, दुसऱ्या चाहत्याने संताप व्यक्त करत म्हटले की, ‘आम्ही 12 हजार रुपयांचे तिकीट खरेदी केले, पण मेस्सीचा चेहराही नीट दिसला नाही. जर आम्हाला त्याला पाहूच द्यायचे नव्हते, तर आम्हाला आमंत्रितच का केले? मेस्सीच्या दौऱ्याबाबत प्रचंड उत्साह असतानाच, कोलकात्यातील हा गोंधळ आयोजकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. चाहत्यांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष अनुभव यातील तफावत या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.