Chota Pudhari Ghanshyam Darode : "गाडी ठरवली, बजेट ठरवलं, 50% ॲडव्हान्स पाठवलं पण नंतर…" दहीहंडीच्या कार्यक्रमावरून छोटा पुढारीने शिवसेना नेत्याला थेट सुनावलं; VIDEO चर्चेत

बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याला देखील एका आयोजकांकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र ऐनवेळेला त्या आयोजकांनी घनश्यामला येण्यास नकार दिला.
Chota Pudhari Ghanshyam Darode :  "गाडी ठरवली, बजेट ठरवलं, 50% ॲडव्हान्स पाठवलं पण नंतर…" दहीहंडीच्या कार्यक्रमावरून छोटा पुढारीने शिवसेना नेत्याला थेट सुनावलं; VIDEO चर्चेत

नुकतीच राज्यासह देशभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. यादरम्यान गोविंदांना आकर्षक करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. यावेळी बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याला देखील एका आयोजकांकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र ऐनवेळेला त्या आयोजकांनी घनश्यामला येण्यास नकार दिला. समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेत्याने दहीहंडीच्या कार्यक्रमाला घनश्यामला बोलावलं होतं. त्यासाठी ॲडव्हान्स रक्कम देखील पाठवली होती. मात्र नंतर त्याने नका येऊ असं म्हटल्याचा आरोप घनश्यामने केला आहे. यावेळी छोटा पुढारीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने शिंदेंच्या शिवसेना नेत्याचा उल्लेख करत त्याच्यावर आरोप करत मराठी कलाकारांना देखील सावध केले आहे.

घनश्याम म्हणाला की,, “मला मुंबईला दहीहंडीसाठी बोलावलं होतं. इतक्या वर्षात ही गोष्ट कधीच कोण न बोलणारा आज मी बोलतोय. मला माहित नाही याचे पडसाद काय उमटणार आहेत, पण कोणीतरी पुढे येऊन बोललं पाहिजे. मला मुंबईला दहीहंडीसाठी बोलावलं होतं. मी गेल्या वर्षीही त्यांची दहीहंडी केली होती. त्यांनी 50% ॲडव्हान्स पाठवल्यानंतर ते मला घ्यायला गाडी पाठवणार होते. आयोजकांनी सर्व व्यवस्थित ठरवलं, गाडी ठरवली आणि बजेट पण ठरवलं. त्यांनी सगळ्यात आधी पहिल्यांदा मला बुकिंग केलं होतं, सगळ्यात आधी ॲडव्हान्स मला पाठवला, नंतर मी त्यांना आणखी काही कलाकारही दिले. नंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं, ‘दादा, आम्ही गाडी पाठवू शकत नाही किंवा तुम्ही नाही आलात तरी चालेल,” मी म्हटलं ठीक आहे. मग ॲडव्हान्सचं काय करायचं? तर त्यांनी ॲडव्हान्स तुम्हाला राहू द्या असं सांगितलं. जसेजसे त्यांना 5 लाख, 6 लाख, 9 लाख असे बिग बजेटवाले हिंदी कलाकार मिळत गेले, तसं त्यांनी मराठी कलाकारांना डावललं”

हेही वाचा- Abhinay Berde: ‘ती सध्या काय करते’ फेम कलाकार अभिनय क्षेत्रातून घेतोय ब्रेक, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, चाहत्यांना धक्का

पुढे घनश्याम म्हणाला, “काही लोकं म्हणतात कलाकारांना खूप एटीट्यूड असतो, ते खूप मानधन सांगतात, त्यांना आधी पैसे द्यावे लागतात, जसं काही आमच्या मंडळावरती विश्वास नसतो. पण प्रश्न मंडळावरती विश्वासाचा नसतो. आमच्या बाबतीत अशा गोष्टी घडलेल्या असतात, झालेल्या असतात. आम्ही दिलेला शब्द पाळतो. आता जर मी दुसरी दहीहंडीला गेलो असतो आणि तुमच्या दहीहंडीला आलो नसतो, तर तुम्ही ‘घनश्याम दरोडे पैशाच्या मागे आहे, तो दहीहंडीला येत नाही, आमच्या दहीहंडीला येतो म्हणून सांगितलं आणि आला नाही’ किंवा जर आमच्याकडून एक कार्यक्रम डबल घेण्यात आला आणि त्यावेळेला जर नाही गेलो, तर डबल ॲडव्हान्स घेतला जातो, अशी मार्केटमध्ये पब्लिसिटी केली असती की नाही? बरोबर ना?”

“मला डावलल्याचं, दहीहंडीचं, इव्हेंट गेल्याचं दुःख मला अजिबात नाही. पण कधीतरी कलाकारांचं दुःख समजत जा. आम्ही काय खूप श्रीमंत नाही. तुमच्या मंडळाची जशी शोची तयारी असते ना, तशी आमची पण काहीतरी तयारी असेल ना? आमच्या मनात पण काहीतरी जिद्द असेल. आम्ही पण कितीतरी इव्हेंट सोडून दिलेले असतात ना? अनेक आयोजकांचे आम्हाला फोन येत असतात. ‘दादा, तारीख आहे का? तारीख आहे का?’ आम्ही सांगतो, ‘गेली’ कारण पहिल्यांदा ॲडव्हान्स येतो. ॲडव्हान्सचा अर्थ काय? की तुमची तारीख बुक झालेली आहे, तुम्ही कुणाचाही कार्यक्रम घेऊ शकत नाही.”

“संबंधित आयोजकांना मला एक विनंती करायची आहे, दादा, आमच्या गरीब कलाकारांबरोबर तुम्ही असं केलं, पण कुठल्याच कलाकारांबरोबर असं करत जाऊ नका. कारण कलाकार हा कलाकार असतो. तो लहान असो वा मोठा असो. तुम्हाला हिंदीवाले मिळाले म्हणून मराठी कलाकाराला डावलणं हे चुकीचं आहे. ही खरी दहीहंडी नव्हे, ही राजकीय दहीहंडी झाली बरं का दादा चला, असू द्या. मला क्षमस्व राग आला असाल तर मनापासून माफी”

“पण मला कलाकारांना एक सांगायचंय, आपण कलाकार आहोत. आपण श्रीमंत नाही. कधीपण अशा मंडळांपासून सावध राहा. मी 50% ॲडव्हान्स घेतलाय, म्हणून आज मी घरी आहे बरं का. मी जर पूर्ण 100 टक्के ॲडव्हान्स घेतला असता, मी त्या दहीहंडीला 100 टक्के दहीहंडी फोडायला आलो असतो. बरोबर ना?”  इव्हेंट घेत असताना आजपासून आधी 100% अमाउंट घ्या, नंतर कार्यक्रमाला जात जा” असं त्याने सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version