मुंबई : एकीकडे महायुतीचा विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली असून त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जागावाटपाबाबत दोन दिवसांपूर्वी प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर आज जागावाटपाच्या निमित्ताने बैठक संपन्न झाली. या 17 पैकी 15 जागांवर आमचे जागावाटपबाबत एकमत झाले आहे. दोन जागांवर अद्याप चर्चा सुरु आहे. येणाऱ्या दोन दिवसांत या दोन जागांबाबत निर्णय होईल. नांदेड आणि नाशिक या जागांबाबत तीनही पक्षांनी दावा केलेला आहे. त्यामुळे या संदर्भात दोन जागा वगळता इतर ठिकाणी आम्ही जागावाटपाच्या अनुषंगाने निर्णय घेतला आहे”, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पुढे त्यांनी नमूद केले की, काँग्रेस आठ ठिकाणी निवडणूक लढणार आहे. यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, लातूर या आठ जागांवर आणि पोटनिवडणूक असलेल्या नागपूरच्या जागेवर निवडणूक लढणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चार ठिकाणी लढत आहे. रत्नागिरी, जळगाव, पभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या तीन ठिकाणी लढत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.