नाशिक : राज्याच्या मराठी भाषा विभागांतर्गत चौथे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज नाशिकमध्ये दिली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडत असून, त्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संमेलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. संमेलनाच्या आयोजनासंदर्भातील तयारीचा सविस्तर आढावा यावेळी मंत्री सामंत यांनी मांडला. हे संमेलन अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, तसेच मराठी भाषेचा अभिमान आणि जतनाचा संदेश जगभर पोहोचवण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले. यंदा या संमेलनाचे चौथे वर्ष असून, त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना उदय सामंत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली. “आपण साहित्य संमेलनात भाषेचा अभ्यास करीत आहोत. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर आहे. या इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. सपकाळ यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, हर्षवर्धन सपकाळ यांच्या अकलेची कीव येते,” असे सामंत यांनी म्हटले.
दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांनी अलीकडे विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांना आजकाल काय झाले आहे, ते कळत नाही. ते प्रत्येकाला ‘माजी करू, माजी करू’ असे म्हणत आहेत. मात्र त्यांच्या घरात अनेक वेळा माजी मंत्री आणि माजी पदे होऊन गेलेली आहेत. आम्ही गणेश नाईक यांचा आणि त्यांच्या वयाचा आदर करतो. एखादे चांगले मंत्रिपद मिळवण्यासाठी जर अशा प्रकारची टीका केली जात असेल किंवा दिल्लीमध्ये माझी जवळीक आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो थांबवावा,” असा इशारा त्यांनी दिला.
“मीही मराठी भाषेचा मंत्री आहे. मी त्यांना व्यवस्थित मराठी भाषेत प्रत्युत्तर देऊ शकतो. काही अडचणी असतील तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्या मांडाव्यात आणि प्रश्न सोडवावेत,” असे सामंत म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जनतेने मान्य केलेले आहे. त्यामुळे केवळ ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळवण्यासाठी त्यांच्यावर टीका करून कोणतेही विधान करू नये, अशी विनंतीही उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना केली.
या बैठकीत आगामी विश्व मराठी शाळा संमेलनाच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला. संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध आणि काटेकोर पद्धतीने करण्यात येत असल्याचे सामंत यांनी नमूद केले. आगामी काळात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता उदय सामंत यांच्या या सर्व वक्तव्यांवर गणेश नाईक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.