Chandrashekhar Bawankule : पूरग्रस्त नरखेड तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी सरकारकडून 32 कोटींची मदत जाहीर; 18 महिन्यांत विकासकामं पूर्ण करण्याचे निर्देश

Chandrashekhar Bawankule : पूरग्रस्त नरखेड तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी सरकारकडून 32 कोटींची मदत जाहीर; 18 महिन्यांत विकासकामं पूर्ण करण्याचे निर्देश

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात पुरामुळे पुनर्वसित करण्यात आलेल्या गावांमध्ये नागरी सुविधा उभारणीच्या कामांना आता वेग येणार आहे. विविध मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 32 कोटी 7 लाख 35 हजार रुपयांच्या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंजूर कामांसाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच, संबंधित सर्व विकासकामे 18 महिन्यांच्या निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुनर्वसित गावांतील नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, त्यांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : Nashik Accident : भीषण अपघात! गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे अपघात झाल्याची स्थानिकांची माहिती; चालकाचा मृत्यू, तर 5 ते 6 जण जखमी

या निधीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला असून निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बावनकुळे यांनी आभार मानले आहेत. मदत व पुनर्वसन विभागाकडून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. निधीतून पुनर्वसित गावांमध्ये रस्ते, गावठाणातील गटारे, भूमिगत नाल्या, सार्वजनिक शौचालय, समाजमंदिरे, क्रीडांगणे, जिल्हा परिषद शाळांच्या संरक्षण भिंती तसेच गुरांसाठी पाण्याचे हौद उभारण्यात येणार आहे. नरखेड तालुक्यातील खैरगाव, देवळी, देवग्राम, मदना, सालाखेडा, पेठ इस्माईलपूर, महेंद्री, खरबडी, खेडी खुर्द, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा आणि खारगड गावांतील कामांचा समावेश यात समावेश करण्यात आला आहे. मंजूर कामांची अंमलबजावणी जिल्हा परिषद, नागपूरच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. सर्व कामे 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचेही स्पष्ट केले आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे जिओ-टॅगिंग करून आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कामांची गुणवत्ता आणि निर्धारित भौतिक मानकांनुसार अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version