शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. गुरुद्वारात दर्शनासाठी गेलेल्या बादल यांच्यावर एका निहंग सिखने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी त्यांना एअरलिफ्ट करून पंजाबला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुद्वारातून बाहेर पडताना हल्ला
ही घटना 13 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड परिसरातील मातासाहेब गुरुद्वाराजवळ घडली. सुखबीर सिंह बादल हे गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बाहेर येत असताना एका निहंग सिखने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने नांदेड शहरातील यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रभर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी विमानाने पंजाबला नेण्यात येणार आहे.
हल्लेखोर जसपालसिंग पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणातील हल्लेखोराला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. जसपालसिंग असं त्याचं नाव असून तो मूळचा पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याचं वय 62 वर्षे असल्याचं समोर आलं आहे. जसपालसिंग पूर्वी पुणे न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होता. मागील दोन वर्षांपासून तो नांदेडजवळील एका गुरुद्वारात सेवा करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. बादल गुरुद्वारातून बाहेर पडत असताना त्याने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून माहिती
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून हल्ल्याबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती आहे.हल्ल्यामागील नेमकं कारण आणि उद्देश काय होता, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, शीख समुदायाकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनीही केली बादल यांच्याशी चर्चा
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बादल यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.
बादल यांच्यावर याआधीही झाला होता हल्ल्याचा प्रयत्न
सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होण्याची ही पहिली घटना नाही. 4 डिसेंबर 2024 रोजी अमृतसरमधील ऐतिहासिक सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी ते या हल्ल्यातून बचावले होते.नांदेड हे शीख धर्मातील पाच तख्तांपैकी एक असलेल्या तख्त सचखंड श्री हजूर साहिबमुळे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. त्यामुळे याच परिसरात सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या पोलिसांकडून हल्लेखोराची चौकशी सुरू असून, या हल्ल्यामागील नेमकं कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.