राजस्थान : राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल काल, सोमवारी जाहीर झाले. यावेळी केवळ एकच मत मिळाल्याचे समजल्यावर भाजपचे उमेदवार कैलाशचंद यांच्यासाठी हा दिवस मात्र लक्षात राहणारा ठरला. हे उमेदवार दिडवाना-कुचामन जिल्ह्यातील पर्वतसर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, काँग्रेसच्या उमेदवार हिना खानम यांनी 376 मते मिळवून हा वॉर्ड जिंकला. तर अपक्ष उमेदवार रशीद खान यांना 195 मते मिळाली.
कैलाशचंद यांनी सांगितले की, ते वॉर्ड 12 चे मतदार होते. परंतु भाजपने त्यांना शेजारच्या वॉर्ड 13 मधून उमेदवारी दिली होती. "मला एक मत मिळालं. माझं स्वतःचं मत प्रभाग 12 मधील आहे, पण मी प्रभाग 13 मधून निवडणूक लढवली होती. त्या प्रभागातीलच एका व्यक्तीने मला मत दिलं आहे," असे ते म्हणाले. पर्वतसर नगरपालिकेत एकूण 25 प्रभाग आहेत. यात काँग्रेसने 13 जागा जिंकून बहुमत मिळवले, तर भाजपला 12 जागा मिळाल्या.
राजस्थानमधील 309 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू असतानाच कैलासचंद यांचा निकाल विशेष लक्षवेधी ठरला. या निवडणुकांमध्ये नगरसेवकांच्या 10 हजारांहून अधिक जागांसाठी लढत झाली होती. राजस्थानमधील 309 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यासाठी ही त्यांच्या तळागाळातील जनाधाराची एक महत्त्वाची कसोटी होती. 9 आणि 11 सप्टेंबर रोजी दोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये 10 महानगरपालिका, 51 नगरपरिषदा आणि 248 नगरपालिकांचा समावेश होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.