मुंबई: ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. संजय दिना पाटील यांनी नुकताच शिवसेना (उबाठा) सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता ते संतापल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकारांनी अलीकडेच केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांवरच संताप व्यक्त करत, “पुन्हा इकडे आलात तर मारून पाठवेन,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीही संजय दिन पाटील यांनी विरोधकांना इशारा देताना केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. त्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र पाठवत कारवाईची मागणी केली होती.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय दिना पाटील यांनी आपण केलेल्या वक्तव्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले. “माझ्यावर चौकशी झाली तरी मी तयार आहे. मी जे बोललो ते उघडपणे बोललो आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपल्याविरोधात बोलणाऱ्या नेत्यांवरही निशाणा साधला. “माझा शिवसैनिकांशी कोणताही संघर्ष नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे माझ्यावर उपकार आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी खासदार झालो,” असे ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.