ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरात जमीन वादातून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जागा बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाईंदर पाडा भागात या वादामुळे दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
स्थानिकांच्या आरोपानुसार, भोईर कुटुंबाच्या सुमारे 24 गुंठे जागेपैकी 12 गुंठे जागा सरनाईक यांच्याकडून बळकावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून परिसरात तणावाचे वातावरण होते. परिस्थिती चिघळत गेल्यानंतर सरनाईक यांच्या कंपनीचे बाऊन्सर आणि स्थानिक नागरिक यांच्यात संघर्ष झाला, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि मारामारी झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या विरोधात जागा बळकावल्याची तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. त्यांनी या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. तसेच, मीरा-भाईंदरमधील भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्तेही सरनाईक यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी दिली आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक वादाला आता स्पष्टपणे राजकीय रंग चढू लागला आहे. जमीन वाद, हाणामारी आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पुढील घडामोडी आणि त्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात पुन्हा ‘चमक’; खरेदीपूर्वी आजचे ताजे दर तपासा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.